Pahalgam Terrorist Attack जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना २२ एप्रिलच्या दुपारी घडली. या हल्ल्यात २६ पर्यटक ठार झाले आहेत. लोकांना धर्म विचारुन त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. दहशतवाद्यांनी पहिला हल्ला शुभम आणि त्याच्या पत्नीवर केला. आता त्याच्या पत्नीने एक महत्त्वाची मागणी केली आहे.

२२ एप्रिलच्या दुपारी काय घडलं?

शुभम आणि त्याच्या पत्नीने दुपारी १ च्या सुमारास हॉटेल सोडलं. त्यानंतर ते घोडेस्वारीसाठी गेले होते. त्यांच्याबरोबरचे इतर कुटुंबीय हॉटेलमध्ये थांबले होते. शुभम आणि त्याची पत्नी फिरायला गेले असतानाच दहशतवाद्यांनी शुभमला गोळ्या झाडून ठार केलं. इश्याना असं शुभमच्या पत्नीचं नाव आहे. शुभमला तिच्या डोळ्यांदेखतच दहशतवाद्यांनी ठार केलं. शुभमचा भाऊ मनोज याने ही माहिती दिली आहे. शुभमचा चुलत भाऊ सौरभ याने ही माहिती दिली की शुभम आणि इशान्या यांचं लग्न १३ फेब्रुवारीला झालं होतं. दोघंही काश्मीरमध्ये कुटुंबीयांसह फिरायला गेले होते. त्याचवेळी ही घटना घडली. आता इश्याना द्विवेदी यांनी सरकारकडे शुभमला शहीद घोषित करावं अशी मागणी केली आहे.

शुभमच्या पत्नीने काय म्हटलं आहे?

“माझी सरकारकडे एक विनंती आहे. काय होतं अशा प्रकारचे जे हल्ले होतात त्यात जे मारले जातात त्यांच्या कुटुंबांना लोक विसरुन जातात. पुलवामाचा हल्ला असो किंवा मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला, लोकांना नंतर काही घेणंदेणं नसतं. शुभमला कुणी विसरु नये असं मला वाटतं. शुभमला शहीद हा दर्जा मिळाला पाहिजे. त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे ही माझी सरकारकडे मागणी आहे. त्याला शहीद असा दर्जा मिळाला तर आम्ही मान उंचावून हे सांगू शकतो की आम्ही हिंदू आहोत. सरकारने त्याला शहीद हा दर्जा द्यावा.”

शुभमला आणि मला दहशतवाद्यांनी विचारलं होतं की हिंदू आहात की मुस्लिम?

पहिली गोळी दहशतवाद्यांनी शुभमवर झाडली होती. तू हिंदू आहेस की मुस्लिम हे विचारलं होतं. मुस्लिम असशील तर कलमा वाच. आम्हाला कलमा नाही येत, आम्ही हिंदू आहोत हे सांगितलं ज्यानंतर त्या दहशतवाद्यांनी शुभमला ठार केलं. मी जे काही पाहिलं आहे त्यावरुन मी हे सांगते आहे की जितक्या लोकांचा मृत्यू झाला काश्मीरच्या हल्ल्यात त्यात शुभम एकटा असेल की गोळीबारानंतर त्याचा चेहराच शिल्लकल राहिला नाही. कारण त्याच्यावर खूप जवळून गोळी झाडली. त्याच्यावर हल्ला केल्यानंतर इतर लोक सावध झाले आणि सैरावैरा पळू लागले. त्यांनाही ठार केलं गेलं पण त्यांच्या कुटुंबाला किमान त्यांचा मृतदेह चेहऱ्यासह मिळाला. मला आणि माझ्या कुटुंबाला त्याचा चेहराही पाहता आला नाही. शेवटचा स्पर्शही करता आला नाही. शहीद असा दर्जा शुभमला मिळाला पाहिजे अशी माझी मागणी सरकारकडे करते असं शुभमच्या पत्नीने म्हटलं आहे.

शुभम द्विवेदीचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबाला समजली. ज्यानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आमच्या मुलाला म्हणजेच शुभमला ज्या क्रूर पद्धतीने मारण्यात आलं तसंच इतर लोकांनाही ठार करण्यात आलं. सरकारने या हल्लेखोरांचा बदला घ्यायला हवा अशी मागणी त्याच्या आई वडिलांनी केली होती. तर शुभमच्या पत्नीने आता शुभमला सरकारने शहीद म्हणून दर्जा द्यावा अशी मागणी केली आहे.