Atul Subhash Suicide: बंगळुरू येथे ऑटोमोबाईल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणारे अतुल सुभाष यांनी पत्नी आणि तिच्या कुटुंबियांच्या छळाला कंटाळून सोमवारी (९ डिसेंबर) आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल यांनी तासाभराचा व्हिडीओ शूट केला. तसेच सुसाइड नोटही लिहिली आहे. यानंतर आता अतुल सुभाष यांच्या भावाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबियावर गुन्हा दाखल केला आहे. अतुलवरील गुन्हे मागे घेण्यासाठी तीन कोटी आणि मुलाला भेटू देण्यासाठी तीस लाख रुपयांची मागणी पत्नीकडून केली गेली होती, असा आरोप अतुल सुभाष यांच्या भावाने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अतुल सुभाष यांनी बंगळुरुच्या मुन्नेकोलाल येथील राहत्या घरी आत्महत्या केली. यानंतर त्यांचा भाऊ विकास कुमार यांनी सोमवारी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया, आई निशा, भाऊ अनुराग आणि काका सुशील यांच्याविरोधात मराठाहळ्ळी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. निकिता आणि तिच्या कुटुंबियांकडून झालेला अनन्वित छळ आणि त्यांच्याकडून केलेल्या सततच्या मागण्यांना कंटाळून अतुल सुभाष यांनी आत्महत्या केल्याचा आरोप विकास कुमार यांनी केला.

हे वाचा >> Atul Subhash : कोण आहे अतुल सुभाष यांची पत्नी निकिता? जिच्यावर २४ पानांचे आरोप करत पतीने संपवले होते जीवन

अतुल सुभाष हे मुळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत. त्यांनी २०१९ साली सॉफ्टवेअर प्रोफेशनल असलेल्या निकिता यांच्याशी विवाह केला होता. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर ते वेगळे झाले होते. सुभाष यांच्याविरोधात खून, हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार अशा प्रकारचे नऊ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील काही गुन्ह्यात अतुल सुभाष यांच्या कुटुंबियांचीही नावे दाखल झाली होती. सुभाष यांनी आत्महत्या करण्यापूर्वी २४ पानांची सुसाइड नोट लिहिली आहे. तसेच ८१ मिनिटांचा व्हिडीओही तयार केला. तसेच उत्तर प्रदेशच्या कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीशांनी पत्नीची बाजू घेतल्याचाही आरोप अतुल सुभाष यांनी लावलेला आहे.

विकास कुमार तक्रार दाखल करताना म्हणाले की, न्यायालयीन लढा सुरू झाल्यापासून माझा भाऊ मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे खचला होता. जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर तू मर, अशी धमकी त्यांनी दिली होती. माध्यमांशी बोलताना विकास कुमार म्हणाले की, जेव्हापासून भावाच्या विरोधात कोणत्याही पुराव्याशिवाय न्यायालयीन खटले दाखल झाले तेव्हापासून तो अडचणीत होता. फक्त न्यायालयाच्या तारखांना हजेरी लावण्यासाठी त्याने बंगळुरू ते जौनपूर असा तब्बल ४० वेळा प्रवास केला होता. भारतात प्रत्येक कायदा महिलेच्या बाजूने आहे. मी याविरोधात ठामपणे लढणार आहे. ज्यातून माझ्या भावाला न्याय मिळेल आणि समाजात एक स्पष्ट संदेश जाईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wife sought rs 3 crore to drop cases rs 30 lakh to let him meet son says atul subhash brother kvg