कॅनबेरा : ‘विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांज बुधवारी चार्टर विमानातून मायदेशी ऑस्ट्रेलियात दाखल झाले. न्यायालयीन सुनावणीदरम्यान घातलेला सूट आणि टाय परिधान केलेल्या असांज यांनी विमानातून बाहेर येताच कॅनबेरा विमानतळावर उपस्थित समर्थकांना अभिवादन केले. यानंतर विमानतळावरील त्यांची पत्नी स्टेला असांज आणि वडील जॉन शिप्टन यांना त्यांनी मिठी मारली. ‘मायदेशी झालेले आगमन हा आपल्यासाठी खूप अतिवास्तव आणि आनंदाचा क्षण आहे’, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी; आतापर्यंत कोणी-कोणी भूषवलं लोकसभेचं अध्यक्षपद? जाणून घ्या!
असांज यांच्यावर इराक आणि अफगाणिस्तानमधील अमेरिकन सैन्याच्या चुकीच्या कृत्यांचा तपशील असलेल्या हजारो युद्ध नोंदी मिळवणे आणि त्या प्रकाशित करण्याचा आरोप होता. त्यांच्या या कृत्यांना माध्यम स्वातंत्र्याअंतर्गत पाठिंबा मिळाला होता, ज्यात त्यांनी लष्करी वर्तणूक आणण्याच्या भूमिकेची घोषणा केली. दरम्यान, विमानात असांज यांच्यासोबत अमेरिकेतील ऑस्ट्रेलियन राजदूत केविन रुड आणि ब्रिटनमधील उच्चायुक्त स्टीफन स्मिथ उपस्थित होते. या दोघांनीही ब्रिटन आणि अमेरिकेबरोबर त्यांच्या स्वातंत्र्याच्या वाटाघाटीत महत्त्वाची भूमिका बजावली.
सरकारचे कौतुक
अमेरिकेतील प्रत्यार्पणाविरोधात असांज यांनी पाच वर्षे ब्रिटिश तुरुंगात दिलेला लढा हा सरकारच्या काळजीपूर्वक, संयम आणि दृढनिश्चयी कार्याचा परिणाम होता, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी संसदेत सांगितले. दरम्यान, आज सायंकाळी मी असांज यांच्याशी चर्चा केली, त्यांनी नि:स्वार्थीपणे ऑस्ट्रेलियन सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केल्याचे अल्बानीज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.