भूकंपाची पूर्वसूचना जंगली उंदीर देऊ शकतात, असे पेरू या देशातील संशोधनात दिसून आले आहे. जगात इ.स.१९०० पासूनच्या मोठय़ा भूकंपांमध्ये १५ लाख लोक मरण पावले असून, नेपाळच्या आताच्या ७.७ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपात ८ हजार लोक मरण पावले आहेत. काही जंगली प्राणी त्याची सूचना देऊ शकतात. त्यात जंगली उंदरांचा समावेश आहे.
तीन उपखंडांतून पेरूतील भूकंपाबाबत मिळालेल्या माहितीनुसार भूकंप होणार असेल, तर ते आधी जंगली उंदरांना कळते. २०११ मध्ये अँडियन खेडय़ात भूकंप झाला होता, त्या वेळी सात दिवस आधीच यानाचागा शेमिलेन नॅशनल पार्कमधील सर्व प्राण्यांनी पळ काढला होता व त्यांच्या हालचाली कॅमेऱ्याने टिपण्यात आलेल्या आहेत. हे सर्व प्राणी भूकंप होऊन गेल्यानंतर पुन्हा आले. संशोधकांच्या मते त्यांचे निष्कर्ष अंतिम नाहीत पण त्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार प्राण्यांना भूकंपाची पूर्वसूचना मिळत असते. वन्य प्राण्यांच्या हालचालींचा अभ्यास केला, तर आधीच भूकंपाची पूर्वसूचना मिळू शकते. भूकंपात भूगर्भातील दगडाचे थर हलतात व त्यामुळे विद्युतभार निर्माण होतो व जमिनीवरच्या पाण्यात तो येतो तसेच काही धनभारित आयन कमी उंचीच्या वातावरणात येतात. आयनभारित हवेमुळे प्राणी भूकंपाच्या आधी सैरभैर होतात व जास्त क्रियाशील होतात. त्यामुळे त्यांच्या हालचालींवरून भूकंपाचे पूर्वानुमान करता येते.
धनभारित आयनामुळे पूर्वानुमान
भूकंप होण्याआधी भूगर्भात ज्या हालचाली होत असतात त्यामुळे धन विद्युतभार वरच्या भागात येतात ते पृथ्वीवरील पाण्यात व भूपृष्ठावर तसेच वातावरणात काही प्राण्यांना अनुभवायला मिळतात. वातावरणातील धनभारित आयनांमुळे जंगली उंदीर भूकंपाआधीच सुरक्षित जागी जातात त्यावरून मोठय़ा भूकंपाचे पूर्वानुमान करता येते.आतापर्यंतच्या संशोधनानुसार चीनमधील पांडा हा प्राणी, गोल्डन विंग वार्बलर हे पक्षी ४८ तास आधीच भूकंपाच्या संकेतानुसार वर्तन बदलतात. गायींच्याही दुधात फरक पडतो. कुत्र्यांच्या भुंकण्यात फरक दिसून येतो.