South Korea Wildfire Video : दक्षिण कोरियामध्ये आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा वणवा पेटला असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मदत करणाऱ्या यंत्रणांकडून लोकांना आणि ऐतिहासिक महत्त्व असणार्‍या प्राचीन कलाकृतींना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान या आगीत आत्तापर्यंत किमान २७ जणांचा मृत्यू झाला आहे. या वणव्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रौद्र रुप घेतलेल्या आगीत ऐतिहासिक मंदिरे देखील जळून भस्म होत आहेत. Cheondeungsan डोंगरावरील आगीत Unramsa हे हजार वर्ष जुने बौद्ध मंदिर जळून खाक झाले आहे.

देशातील सर्वात भीषण वणवा आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा काम करत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये अग्निशमन दलाचे जवान जंगलात धावपळ करताना दिसून येत आहेत. तर आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरात पसरल्याचे पाहायला मिळत आहे.

रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार, मध्य Uiseong काउंटीमध्ये सुरू झालेल्या वणव्यांमुळे ३३,००० हेक्टर (८१,५०० एकर) पेक्षा जास्त आकाराचा परिसर जळून खाक झाला आहे. यासह ही आगीची आजवरची सर्वात मोठी घटना ठरली आहे. यापूर्वी मार्च २००० मध्ये लागलेल्या आगीत २४,००० हेक्टर्स (५९,००० एकर्स) भाग जळून खाक झाला होता.

आग आटोक्यात आणताना अडचणी

दक्षिण कोरियात आग लागलेला भाग हा डोंगराळ भाग आहे, त्यामुळे वणवा नियंत्रणात आणण्यासाठी हेलिकॉप्टर्सचा वापर करावा लागत आहे आणि सरकारने दिलेल्या माहितीनुसार १२०हून अधिक हेलिकॉप्टर्स तीन भागात तैनात करण्यात आले आहेत. आगीचा सामना करताना एका दुर्घटनेत एका हेलिकॉप्टर पायलटचा मृत्यू झाल्याची घटना देखील बुधवारी घडली.

प्रशासनाने वणव्यात मृत्युमुखी पडलेल्यांची माहिती उघड केलेली नाही, परंतु बहुतेक जण ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे होते. वणव्यातून लवकर बाहेर पडणे शक्य न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.