पीटीआय, अथेन्स
अल्जेरिया, इटली आणि ग्रीस या देशांमध्ये लागलेल्या वणव्यांमुळे ४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. भूमध्य सागर प्रदेशातील इटली आणि ग्रीस आणि भूमध्य सागराला लागून असलेल्या अल्जेरिया या देशांना उष्णतेमुळे लागलेल्या वणव्याचा फटका बसला आहे. ग्रीसमधील संपूर्ण ऱ्होड्स बेटावर आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली असून कोर्फू आणि एव्हिया या बेटांवरही वणवा पसरला आहे. यामुळे ग्रीसच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट आली असून काही भागांमध्ये तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत वाढले आहे. ग्रीसमध्ये लागलेला वणवा इटलीमध्येही पसरला असून सिसिली आणि पुगलिया प्रदेशांतील हजारो लोकांना घरदार सोडून निघून जावे लागले आहे.
वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आणि जळत राहणाऱ्या वनस्पतींमुळे अग्निशमन दलांना आग विझवण्यास जास्त परिश्रम घ्यावे लागत आहेत. सर्वाधिक जीवितहानी अल्जेरिया येथे झाली असून १० सैनिकांसह ३४ जणांचा बळी गेला आहे. पूर्व अल्जेरियामधील बेजया या किनारपट्टीवरील प्रांताला सर्वाधिक फटका बसला आहे. एकटय़ा बेजयामध्ये २३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
अल्जेरियामधील ८० टक्के आग आटोक्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र अजूनही उरलेली आग विझवण्यासाठी शेकडो अग्निशमन यंत्रासह तब्बल आठ हजार कर्मचारी तैनात आहेत. आग विझवण्यासाठी विमानांचीही मदत घेतली जात आहे.
ग्रीसमधील विमान कोसळून दोन वैमानिक ठार
दक्षिण ग्रीसमध्ये वणवे विझवण्यासाठी पाण्याचे फवारे मारणारे ग्रीक हवाई दलाचे विमान या मोहिमेवर असताना मंगळवारी कोसळले. त्यात दोन वैमानिक मृत्युमुखी पडले. ग्रीसमध्ये सध्या आलेल्या उष्णतेच्या लाटेच्या पुनरागमनामुळे अनेक ठिकाणी वणवे पेटले आहेत. ते विझवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत.
इटलीत तिघांचा मृत्यू
दक्षिण इटलीतील सिसिली बेटावर तीन ज्येष्ठ नागरिक मृत्युमुखी पडले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेची लाट आणि उत्तरेकडील शक्तिशाली वादळामुळे आग भडकून पसरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार सिसिलीची राजधानी पालेर्मोलगतच्या भागात या वणव्यामुळे जळालेल्या घरात सत्तरीतल्या एका दांपत्याचे जळालेले मृतदेह आढळले. पालेर्मो भागातच दुसऱ्या घटनेत आगीत अडकलेल्या एका ऐंशी वर्षीय महिलेच्या मदतीसाठी रुग्णवाहिका आगीमुळे पोहोचू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला.