संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार असे स्पष्ट संकेत मिळत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र अधिवेशनात उपयुक्त आणि रचनात्मक चर्चा होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. अधिवेशनापूर्वी सरकारशी झालेल्या चर्चेच्या वेळी विरोधी पक्षातील मित्रांनी विविध प्रश्नांवर सकारात्मकता दर्शविली, असेही मोदी म्हणाले.
विरोधी पक्षांनी सरकारवर चौफेर टीका करावी आणि कारभारातील उणिवा अधोरेखित कराव्या, त्यामुळे लोकशाही अधिक सुदृढ होते, विरोधकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारने औपचारिकता बाजूला ठेवली असे उदाहरण त्यांनी या वेळी दिले. देशातील १२५ कोटी जनतेचे लक्ष संसदेकडे, रेल्वे अर्थसंकल्पाकडे आणि सार्वत्रिक अर्थसंकल्पाकडे लागले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताच्या असलेल्या स्थानामुळे जगाचेही अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलेले आहे, असेही मोदी म्हणाले. विरोधकांशी चर्चा सकारात्मक झाली असल्याने संसदेत उपयुक्त आणि रचनात्मक चर्चा होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.