देशात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे सरकार बहुमताने सत्तेवर आल्यावर शेतकर्‍यांचा प्रश्न जसा तातडीने सोडवणार आहे तसेच राफेल कराराची सखोल चौकशी करून यातील सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुलढाणा येथील जाहीर सभेत दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार म्हणजे देणारच शिवाय उत्पन्नाच्या दीडपट हमीभाव देवू. आम्ही नुसत्या घोषणा करत नाही. यापुर्वीही कर्जमाफी दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तडजोड नाही म्हणजे नाही,” असे पवार यांनी बुलढाणा येथे सांगितले. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची आज जाहीर सभा बुलढाण्यात पार पडली.

यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मोदींची हुकुमशाही ते चौकीदार चोर है पर्यंतचे मुद्दे आपल्या भाषणात घेताना मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. लोकशाहीची चौकट मोडू पाहणार्‍या मोदींवर टीकास्त्र सोडतानाच परिवर्तन करण्यासाठी आणि मोदी सरकार घालवण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.

मी तुमच्यातील माणूस आहे हे लक्षात घ्या. दहा वर्ष त्या खासदाराला संधी दिलात मला फक्त ५ वर्षे संधी द्या तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही असे आश्वासन उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवींद्र तुपकर यांनी आपल्या भाषणात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तर आमदार जोगेंद्र कवाडे यांनीही मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. कॉंग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांनीही मोदी व फडणवीस सरकारवर टीका करताना संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आल्यावर शेतकर्‍यांना कर्जमाफी देणार असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will bring the truth behind rafael deal for sure says sharad pawar