भारतात दहशतवादी कारवाया करून परदेशात पळून गेलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासह सर्वच आरोपींना एकामागोमाग एक करीत देशात परत आणू, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी व्यक्त केला. शिंदे यांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकालात परदेशात पळून गेलेल्या अनेक कुख्यात दहशतवाद्यांना जेरबंद करण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. त्यामुळे शिंदे यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे.
परदेशात पळून गेलेल्या एकेकाला पकडून भारतात आणू असे सांगतानाच १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर हव्या असलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत सर्वात वर असलेल्या दाऊदलाही पकडून न्याय व्यवस्थेसमोर आणून उभे करू, असे शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दाऊदला सरकार कधी भारतात आणू शकेल का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर शिंदे यांनी सर्व फरार दहशतवाद्यांना भारतात आणण्याबाबतचा निर्धार बोलून दाखवला.
दाऊद इब्राहिम याचे अल कायदा या दहशतवादी संघटनेशी जवळचे संबंध असल्याचे स्पष्ट करीत अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी म्हणूनही घोषित केले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रापुढे हे प्रकरण नेऊन दाऊदची जगभरातील मालमत्ता जप्त करून त्याच्या कारवायांचा बीमोड करण्यास सरसावली आहे. सध्या दाऊद पाकिस्तानात असल्याचे बोलले जाते.
दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरक्षा यंत्रणांनी आतापर्यंत अनेक कुख्यात फरार दहशतवाद्यांना भारतात परत आणण्याची कामगिरी केली आहे. त्यामध्ये सईद झबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबु जिंदाल, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागील आरोपी फसिह महमूद, अब्दुल करिम टुंडा आणि यासिन भटकळ यांचा समावेश आहे. शिंदे यांनी गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला होता. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा