उत्तराखंड विधनासभा निवडणुकीअगोदर भाजपामध्ये मोठी राजकीय उलाथापालथ पाहायला मिळत आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या दोन बैठकानंतर भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रेसिंह रावत यांना बोलावून घेतले आहे. मुख्यमंत्री रावत यांनी सोमवारी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीअगोदर त्यांनी राज्यसभा सदस्य अनिल बलूनी यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर नड्डांसोबत त्याची जवळपास ४० मिनिटं चर्चा झाली. या चर्चेनंतर माध्यमांच्या कोणत्याही प्रश्नाचे रावत यांनी उत्तर दिले नाही व ते दिल्लीकडे रवाना झाले.
प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री रावत हे आज (मंगळवार) सायंकाळी राजीनामा देण्याची शक्यता असुन, ते ४ वाजता राज्यापालांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत देखील असतील. सुत्रांच्या हवाल्याने आज सकाळी काही माध्यमांनी सांगितले होते की, रावत यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं जाण्याचं शक्यता आहे.
मुख्यमंत्री रावत आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यातील बैठक ही दोन दिवसांपासून उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या नाट्यमय घडमोडींच्या पार्श्वभूमीवर पार पडली. जेव्हा भाजपा उपाध्यक्ष रमन सिंह आणि सरचिटणीस व राज्याचे प्रभारी दुष्यंत गौतम हे कोणताही नियोजीत कार्यक्रम नसताना देहरादूनला पोहचले आणि राज्याच्या कोर कमिटीतील नेत्यांसोबत बैठक केली होती. यानंतर या दोघांनी देखील आपला अहवाल भाजपा अध्यक्ष नड्डा यांच्याकडे सोपवला होता.
पक्षाच्या आमदारांमधील वाढता असंतोष आणि मंत्रिमंडळाच्या बहुप्रतीक्षित विस्ताराचा वेळोवेळी निर्माण होणारा मुद्दा यामुळे राज्यात नेतृत्वबदल होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.