Canada on US Tarrif Battle : अमेरिकेने अनेक देशांवर आयात शुल्क लादल्याने जगभरातील देशांतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर, कॅनडाने त्यांची वीज खंडित करण्याचाच इशारा दिला आहे. सोमवारी टोरोंटो येथे झालेल्या खाण परिषदेत बोलताना कॅनडातील ओंटारियोचे प्रीमिअर डग फोर्ड यांनी इशारा दिला. ते म्हणाले, त्यांना ओंटारियोचा नाश करायचा असेल तर मी माझ्या चेहऱ्यावर हास्य ठेवून त्यांच्या ऊर्जेचा नाश करण्यासह सर्वकाही करेन. ते आमच्या ऊर्जेवर अवलंबून आहेत. त्यांना आमच्या वेदना जाणवल्या पाहिजेत.” टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत फोर्ड यांनी अमेरिकेतली महत्त्वाच्या राज्यातील वीज खंडित करण्याचा पुन्हा इशारा दिला. न्यू यॉर्क, मिशिगन आणि मिनेसोटामधील १.५ लाख घरांना ओंटारियोमधून वीजपुरवठा केला जातो. हा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा त्यांनी दिली. ही परिस्थिती अनावश्यक आहे. परंतु, आमच्याकडे प्रतिक्रिया देण्याशिवाय पर्याय नाही. मी अमेरिकन लोकांची मनापासून माफी मागतो. हे तुमच्यासाठी नाही. तुमचे अध्यक्ष ही समस्या निर्माण करत आहेत”, असंही ते म्हणाले.
कॅनेडियन, मेक्सिकन आणि चिनवर अमेरिकेने २५ टक्के आयातशुल्क लादले आहे. याबाबत फोर्ड म्हणाले, मी हे टॅरिफ युद्ध सुरू केलेले नाही. परंतु आम्ही हे टॅरिफ युद्ध जिंकणार आहोत.”
आम्ही चर्चा करायला तयार
फोर्ड यांच्या विधानाबाबत गर्व्हनर कॅथी होचुल यांना विचारलं असता ते म्हणाले, या संकटाच्या काळात आपण एकमेकांना कसे पाठिंबा देऊ शकतो यावर त्यांच्याशी अतिरिक्त चर्चा करण्यास मला आनंद होईल.”
टॅरिफबाबत डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
ट्रम्प म्हणाले, अमेरिकेला पुन्हा श्रीमंत बनवायचं आहे आणि हीच आपली जबाबदारी आहे. आपल्याला अमेरिकेला महान बनवायचं आहे. आयात शुल्कासारख्या निर्णयांचा आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर थोडासा त्रास होईल. परंतु, त्यामुळे अमेरिकेला श्रीमंत होण्यास मदत मिळेल. टॅरिफ हा अमेरिकेला पुन्हा श्रीमंत व महान बनवण्याचा मार्ग आहे. आम्ही जसं ठरवलं होतं तसं घडत आहे आणि लवकरच आपण श्रीमंत होऊ. थोडा गोंधळ होईल पण आम्हाला ते मान्य आहे. परंतु, त्याने फार मोठा फरक पडणार नाही.