संसदेत राज्यांच्या अखत्यारितील विषयांवर चर्चा होऊ नये, हा संकेत मोडून गुजरातचे पोलीस अधिकारी डी. जी. वंजारा यांच्या पत्रावरून चर्चा करायची काँग्रेसची खुमखुमी शमली आहे. कारण त्यांनी वंजारांचा मुद्दा काढला तर आम्हीही अशोक खेमका यांचा मुद्दा घेऊ, या भीतीने ते गप्प झाले आहेत, असा टोला भाजप नेते एम. व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना लगावला.
वंजारा यांच्या पत्रावरून संसदेत बोलायची काँग्रेस सदस्यांना इच्छा होती. तुम्हाला जर हा विषय आणायचा असेल तर आम्ही त्यासाठी चर्चेस तयार आहोत. पण मग हरयाणातील गरीब शेतकऱ्यांच्या बाजूनेही आम्ही उभे राहू आणि प्रशासकीय अधिकारी अशोक खेमका यांचाही मुद्दा मांडू, असे नायडू म्हणाले.
नायडू यांचा मुद्दा गैरलागू असल्याचे सांगत काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी म्हणाल्या की या दोन्ही मुद्दय़ांमध्ये कोणतेही साम्य नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यावर गंभीर आरोप करणारे पत्र लिहिले आहे. रॉबर्ट वढेरा हे काही मुख्यमंत्री नाहीत. तुम्ही त्यांना मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहात असाल तर आमचे काही म्हणणे नाही, असेही त्या म्हणाल्या. वंजारा यांच्या पत्रावरून संसदेत आधीच मते व्यक्त झाली आहेत, असेही चौधरी यांनी नमूद केले.
मायावतींनाही वंजाराप्रश्नी चौकशी हवी
वंजारा यांनी गुजरात सरकारविरोधात केलेल्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि या प्रकरणाची संसदेत चर्चा करावी, अशी मागणी बसपाने केली आहे.
वंजारा यांनी केलेल्या आरोपांची संसदेत चर्चा करावी, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. त्याचबरोबर ही बाब अत्यंत गंभीर असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, असे बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. या प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी झाल्यास अनेक उच्चपदस्थ चौकशीच्या फेऱ्यात सापडतील. या प्रकरणाच्या चौकशीतून नोकरशाहीला धडा मिळेल आणि त्यातून नोकरशाही आपले कर्तव्य पार पाडताना अधिक सावध आणि जबाबदारीने वागतील, असेही मायावती यांनी म्हटले आहे. ही चौकशी सीबीआयमार्फत व्हावी की अन्य संस्थेमार्फत, असे विचारले असता मायावती म्हणाल्या की, सर्व पक्ष सीबीआय चौकशीसाठी अनुकूल असतील तर ते योग्य ठरेल.

Story img Loader