तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी, ‘सनातन धर्म हा समता व सामाजिक न्यायाविरोधात असून या धर्माला संपवून टाकले पाहिजे’, असे विधान केलं होतं. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अयोध्येचे संत परमहंस आचार्य यांनी उदयनिधी यांचा शिरच्छेद करण्यासाठी इनामही जाहीर केले होते. उदयनिधी यांचे शिरच्छेद करण्यासाठी १० कोटींचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे. यावरून उदयनिधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उदयनिधी काय म्हणाले होते?

उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्माचं उच्चाटन करण्याची भूमिका मांडली होती. “सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं उच्चाटन केलं जायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ कत नाही. त्यांचं उच्चाटनच केलं जायला हव. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं”, असं विधान उदयनिधी यांनी चेन्नईत एका कार्यक्रमात केलं.

हेही वाचा >> “काही लोक बालिश…”, सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाशी तुलना केल्यानंतर स्टॅलिनपुत्र उदयनिधींचं स्पष्टीकरण!

संत परमहंस आचार्यांनी काय इनाम जाहीर केलं होतं?

अयोध्येतील संत परमहंस आचार्य यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये ते एका हातात उदयनिधीचे पोस्टर आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन उदयनिधी यांचा प्रतिकात्मक शिरच्छेद करताना दिसत आहेत. ते पोस्टर पेटवतानाही दिसत आहेत. द्रमुक नेत्याचा शिरच्छेद करणाऱ्याला १० कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. तसंच, उदयनिधी यांचा शिरच्छेद कोणी करण्यास कोणी पुढे आलं नाही तर ते स्वतः उदयनिधी यांना शोधून त्यांचा शिरच्छेद करतील, असा इशाराही दिला.

उदयनिधी यांचं प्रत्युत्तर काय?

संत परमहंस आचार्य यांची ही धमकी समोर येताच उदयनिधी यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. उदयनिधी म्हणाले की, “आज एका स्वामींनी माझा शिरच्छेद करण्यासाठी १० कोटी रुपयांचे इनाम जाहीर केले. ते म्हणाले की जो उदयनिधीचा शिरच्छेद करेल त्याला १० कोटी रुपये मिळतील. ते खरे संत आहेत की बनावट? तुम्हाला माझे डोकं का आवडते? एवढे पैसे कुठून आणताय? माझ्या डोक्यासाठी दहा कोटी कशाला मोजता? त्यापेक्षा मला दहा रुपयांचा कंगवा द्या मी माझे केस स्वतः विंचरेन”, असा उरपोधिक टोला त्यांनी लगावला आहे.

‘उदयनिधी यांनी माफी मागावी’

दिल्लीमध्ये भाजपच्या शिष्टमंडळाने तमिळनाडू सदनाला भेट देऊन राज्याच्या आयुक्तांकडे निषेध पत्र दिले आणि उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. वीरेंद्र सचदेव, खासदार हर्ष वर्धन आणि खासदार परवेश वर्मा यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will do it on my own if udhayanidhi on seers rs 10 crore bounty for his head sgk