सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तर आपलं सरकार आलं तर जुन्या नोटा बदलून देऊ असं आश्वासन दिलं आहे. सरकार व्यापाऱ्यांना धमकावून भाजपाचा प्रचार करण्यास भाग पाडत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
‘नोटांबदीमुले व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं असून अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. काही व्यापाऱ्यांकडे अद्यापही चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा असल्याची माहिती मला मिळाली आहे. आमचं सरकार आलं तर आम्ही या जुन्या नोटा बदलून देऊ’, असं आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे. हिंगोली लोकसभा निवडणुकीतील वंचित आघाडीच्या उमेदावारासाठी आयोजित प्रचारसभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी हे आश्वासन दिलं. यावेळी त्यांनी काही करुन चोरांचं सरकार येऊ देऊ नका असं आवाहनही केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करत 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. यानंतर सामान्य नागरिकांना आपल्याकडे असणाऱ्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकेबाहेर रांगेत उभं राहावं लागलं होतं. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली होती. नोटाबंदीमुळे अनेक छोट्या व्यापाऱ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप विरोधक नेहमी करतात.