पक्षाने सांगितले तर आपण आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढायला तयार आहोत, असे माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
किरण बेदी यांनी गुरुवारीच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी किरण बेदी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवतील, असे जाहीर केले. मात्र, त्या कुठून निवडणूक लढविणार हे जाहीर करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर किरण बेदी पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील का, याचाही अजून निर्णय झालेला नाही. भाजपचा संसदीय पक्ष याबाबत निर्णय घेईल, असे अमित शहा यांनी स्पष्ट केले होते.
किरण बेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून त्या अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढविणार का, असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला आहे. किरण बेदी यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर आम आदमी पक्षाकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. राजकारणात प्रवेश करणार नाही, असे बेदी यांनी यापूर्वी जाहीर केले होते. याच मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. या टीकेला उत्तर देताना त्या म्हणाल्या, मी माझे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्त्वामुळेच मी सक्रीय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. कोणी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची, याचा निर्णय पक्ष घेतो. मी पक्षादेश पाळणार आहे. त्यांनी मला जर अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात लढण्याचा आदेश दिला. तर मी लढायला तयार आहे. पक्षनेतृत्त्वाला माझ्यापेक्षा जास्त कळते. त्यांनी मला जिंकण्यासाठी आणले आहे. हरण्यासाठी नाही, असेही किरण बेदी यांनी सांगितले.

Story img Loader