इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला सात दिवस पूर्ण झाले आहेत. हमासने शनिवारी, ७ ऑक्टोबरला अनपेक्षितपणे इस्रायलवर रॉकेट हल्ले केले होते. या हल्ल्यानंतर इस्रायलही आक्रमक झाला आहे. शुक्रवारी इस्रायलने २४ तासांत गाझा सोडण्याचे आदेश नागरिकांना दिले होते. अशातच इस्रायलचं पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला थेट इशारा दिला आहे. बदला घेण्यास आताच सुरूवात झाली आहे, असं बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे.
“शत्रूंनी किंमत मोजायला सुरूवात केली आहे. पुढं काय होईल, सांगता येत नाही. पण, ही फक्त सुरूवात आहे. ज्यू नागरिकांवर लादलेल्या युद्धाला आम्ही कदापीही माफ करणार नाही. शत्रूशी लढण्यासाठी सर्व ताकदीचा वापर करू,” असं बेंजामिन नेतान्याहू म्हणाले.
हेही वाचा : चीनमध्ये इस्रायली राजदूताला चाकूनं भोसकलं, थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
पुतिन यांचा इस्रायलला इशारा
हमासविरोधात जमिनीवरील मोहीम सुरू करण्यासाठी सैन्य तयार असल्याचं इस्रायलच्या लष्कराकडून शुक्रवारी सांगण्यात आलं. पण, “इस्रायलच्या जमिनी मोहिमेमुळे अनेक नागरिक मारले जातील. जे अमान्य आहे,” अशा शब्दांत पुतिन यांनी इस्रायलला सुनावलं होतं.
हेही वाचा : “भाऊ असावा तर असा”, इस्रायलने मानले अमेरिकेचे आभार; संरक्षणमंत्री म्हणाले, “तुम्ही दाखवून दिलं…”
“इस्रायलवर अनपेक्षितपणे हल्ला झाला. इस्रायलला आपल्या संरक्षणाचा संपूर्ण अधिकार आहे. पण, आता रक्तपात थांबला पाहिजे. इस्रायलनं गाझावर जमिनीवरील हल्ले केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. नागरिकांचे मृत्यू अमान्य आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे रक्तपात थांबवणे गरजेचं आहे. रशिया सर्वांशी चर्चा करण्यास तयार आहे,” असं आवाहन व्लादिमीर पुतिन यांनी केलं होतं.