शिवराज सिंह चौहान यांनी दीर्घकाळ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषविले. मात्र यंदा झालेल्या निवडणुकीत भाजपाने त्यांना बाजूला केले. शिवराज चौहान यांना अद्याप कोणतेही पद दिलेले नाही. त्यावरून शिवराज सिंह चौहान यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली की, ते नाकारलेले मुख्यमंत्री नाहीत. त्यानंतर त्यांचा मुलगा कार्तिकेय चौहान याचे मोठे विधान समोर आले आहे. शुक्रवारी भेरुंदा जिल्ह्यातील कोसमी येथे विकसित भारत संकल्प यात्रेत कार्तिकेय सहभागी झाले. त्यावेळी जनतेला उद्देशून ते म्हणाले, “तुम्हाला जी आश्वासने दिली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी मला आमच्याच सरकारच्या विरोधात जावे लागले तरी त्यासाठी मी तयार आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्तिकेय चौहान पुढे म्हणाले, “मी नेता नाही. राजकारणात येण्याचा विचारही माझ्या मनात नाही. पण वडिलांसाठी मी तुमच्याकडे मत मागायला आलो होतो. त्यावेळी मी तुम्हाला आश्वासने दिली होती, ती पूर्ण झाली नाहीत तर आपल्याच सरकारच्या विरोधात जाण्याचीही माझी तयारी आहे. पण याची गरज भासणार नाही, कारण सरकार आपले आश्वासने पूर्ण करण्यास सक्षम आहे.”

दोन दिवसांपूर्वी एका सभेला संबोधित करत असताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मी मुख्यमंत्रीपदावर नसूनही लोकांचे भक्कम प्रेम मला मिळत आहे. मी आता जनतेशी नाकारलेला मुख्यमंत्री म्हणून नाही तर माजी मुख्यमंत्री म्हणून संवाद साधत आहे. अनेकवेळेला दीर्घकाळ मुख्यमंत्रीपदावर राहिल्यानंतर लोकांचा रोष सहन करावा लागतो आणि टीका झाल्यानंतर मुख्यमंत्रीपद सोडावे लागते. मात्र मी मुख्यंमत्रीपदावरून बाजूला झाल्यानंतरही लोक मला प्रेम देत आहेत. जिथे जातो, तिथे लोक ‘मामा’ म्हणून हाक मारतात. लोकांचे प्रेम हीच माझी खरी संपत्ती आहे.

चौहान पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री पदावरून जरी मी बाजूला झालो असलो तरी सक्रिय राजकारण मी सोडलेले नाही. मी सध्या कोणत्याही पदावर नसलो तरी लोकांना सेवा देण्याचे काम करत राहणार आहे.

शिवराज चौहान यांनी चार वेळा सलग (२०१८ चा एक वर्षाचा अपवाद वगळता) मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. यावेळी पाचव्यांदा तेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र भाजपाने तीनही राज्यात नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्रीपदी संधी दिली आणि मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकण्यात आली. भाजपाने २३० विधानसभा जागेपैकी १६३ जागांवर विजय मिळविला होता.

कार्तिकेय चौहान यांनी विकसित भारत संकल्प यात्रेत बोलताना म्हटले की, शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा सरकार आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. जे कुणालाही शक्य झाले नसते. वीस वर्ष राज्यात सरकार असूनही त्यानंतर मोठ्या बहुमताने पुन्हा एकदा सरकार आणून दाखविले. मध्य प्रदेशसह इतर राज्यातही निवडणुका झाल्या. पण तिथे विद्यमान सरकार उलथले गेले. फक्त मध्य प्रदेशने आपली सत्ता राखली. याचे श्रेय माझे वडील शिवराज सिंह चौहान यांना जाते, असेही कार्तिकेय म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will fight own government says shivraj chouhans son kartikey chouhan after not rejected cm remark kvg