स्फोट कोणी घडवून आणले, हे अजून आम्हाला माहिती नाही. मात्र, आमचा तपास वेगाने सुरू झालाय. अमेरिकी नागरिकांनी या स्फोटांतून तूर्ततरी कोणताही अर्थ काढू नये. आम्ही कारस्थान रचणाऱयांपर्यंत नक्कीच पोहोचू आणि त्यांना कायद्याप्रमाणे अद्दल घडवू, ही प्रतिक्रिया आहे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची. बॉस्टन शहरात स्थानिक वेळेनुसार सोमवारी दुपारी दोन बॉम्बस्फोट झाले. त्यामध्ये तीन जणांचा बळी गेला असून, १४० लोक जखमी झाले आहेत. 
११ सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी दहशतवादाचा भयानक चेहरा पुन्हा एकदा अमेरिकी नागरिकांना दिसला. दहशतीच्या छायेखाली चिंताक्रांत झालेले अनेक चेहरे बॉस्टनच्या रस्त्यावर सैरभेर धावताना दिसले. या पार्श्वभूमीवर लोकांना धीर देण्याचे काम ओबामा यांनी आपल्या भाषणातून केले.
स्फोट कोणी घडवून आणले, हे आम्ही लवकरच शोधून काढू, त्यांनी ते का घडवले, याचाही आम्ही छडा लावू. स्फोटामध्ये कोणत्या व्यक्तींचा किंवा संघटनांना हात आहे. ते शोधून त्यांना कायद्याप्रमाणे शिक्षा दिली जाईल, असे ओबामा यांनी व्हाईट हाऊसमधून सांगितले. स्फोटाची माहिती मिळाल्यावर बॉस्टनचे मेयर आणि मॅसेच्युसेट्सचे गव्हर्नर यांच्याशी माझी चर्चा झालीये. त्यांच्याकडून मी परिस्थितीची माहिती घेतलीये. जसजसे आमच्या तपास पथकाला या स्फोटांबद्दल माहिती मिळत जाईल, तसतशी ती माध्यमांना देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader