सोनमर्ग : जम्मू-काश्मीरच्या जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. काश्मीर खोरे आणि लडाखला जोडणाऱ्या झेड-मोढ या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या बोगद्याचे उद्धाटन केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. त्यांच्यापूर्वी भाषण करताना जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी केली होती. त्यावर या मुद्द्याचा थेट उल्लेख न करता मोदी यांनी वरीलप्रमाणे आश्वासन दिले.
काश्मीर हा भारताचा मुकूट असल्याची प्रशंसा मोदी यांनी आपल्या भाषणात केली. या मुकुटात विकासकामांची रत्ने बसवल्यानंतरच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल असे ते म्हणाले. तर मोदी यांनी बोगदा बांधण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यांनी त्याचे पालन केले अशी प्रशंसा ओमर अब्दुल्ला यांनी केली. तसेच त्यांनी पंतप्रधानांचे आभारही मानले.
बोगद्याचे उद्धाटन केल्यावर मोदींनी त्यातून फेरफटका मारला. यावेळी त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांशी संवाद साधला, तसेच अतिशय खडतर हवामानात काम करून बोगदा पूर्ण करणाऱ्या बांधकाम कामगारांनाही ते भेटले. त्यापूर्वी त्यांचे विमान सकाळी १०.४५ वाजता श्रीनगरला उतरले, तिथून हवाई मार्गाने ते सोनमर्गला गेले. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक सभेत भाषण केले. जम्मू-काश्मीरमध्ये मागील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे.
बोगद्याची वैशिष्ट्ये
मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगिर आणि सोनमर्ग दरम्यानचा हा बोगदा ६.४ किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी २,७०० कोटी रुपये खर्च आला. बोगदा दुपदरी असून आपत्कालीन परिस्थितीसाठी त्याला समांतर असा ७.५ मीटर लांबीचा मार्ग बांधण्यात आला आहे. हा बोगदा समुद्रसपाटीपासून ८,६५० फूट उंचावर असून, तो सर्व हवामानात कार्यरत असेल. मुख्य म्हणजे भूस्खलन आणि हिमस्खलन होणाऱ्या मार्गाला हा बोगदा वळसा घालून जाईल. या बोगद्यामुळे काश्मीर खोरे आणि लडाखमधील अंतर सहा किलोमीटरने कमी होतानाच वाहनाचा ताशी वेग ३० किलोमीटरवरून ताशी ७० किलोमीटर इतका वाढणार आहे.
ओमर अब्दुल्लांकडून मोदींची प्रशंसा
काश्मीर हा भारताचा मुकूट असल्याची प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केली. या मुकुटात विकासकामांची रत्ने बसवल्यानंतरच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल असे ते म्हणाले. तर मोदी यांनी बोगदा बांधण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यांनी त्याचे पालन केले, अशी प्रशंसा ओमर अब्दुल्ला यांनी केली. तसेच त्यांनी पंतप्रधानांचे आभारही मानले.
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत द्यावा. पंतप्रधानांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी, सप्टेंबरमध्ये येथील जनतेला तसे आश्वासन दिले होते. तुम्ही तुमचे आश्वासन पूर्ण कराल असे माझे मन मला सांगत आहे. – ओमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री जम्मू-काश्मीर
तुम्हाला यावर विश्वास ठेवावा लागेल की, हे मोदी आहेत आणि ते त्यांचे आश्वासन पाळतात. प्रत्येक गोष्टीची योग वेळ असते आणि योग्य वेळेला योग्य गोष्टी घडतील. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान