तिसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणाऱ्या नवाझ शरीफ यांनी शपथविधी समारंभासाठी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. मनमोहन सिंग शपथविधी समारंभासाठी आल्यास आपल्याला खूप आनंद होईल, असे नवाझ शरीफ यांनी सोमवारी सांगितले.
पत्रकारांशी याबाबत बोलताना नवाझ शरीफ म्हणाले की, भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी रविवारी फोनवरून दीर्घ चर्चा केली. मनमोहन सिंग यांचे मूळगाव पाकिस्तानात असून आम्ही दोघांनी एकमेकांना भेटीचे आमंत्रण दिल्याचेही शरीफ यांनी सांगितले. शपथविधी समारंभासाठी त्यांना बोलावण्यास आम्हाला आवडेल. मात्र ते येतील किंवा नाही हा भाग अलाहिदा. परंतु असे असले तरी ते लवकरच पाकिस्तान दौऱ्यावर येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नवाझ शरीफ यांचे लगेचच अभिनंदन केले. तसेच दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत व्हावेत यासाठी मिळून काम करण्याचा विश्वासही सिंग यांनी व्यक्त केला.
भाजपची टीका
दरम्यान, नवाझ शरिफ यांच्या पक्षाचा विजय झाला म्हणून उतावीळपणा दाखवून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना भारत -भेटीचे निमंत्रण दिले असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने सोमवारी केली. पाकिस्तानच्या वागणुकीत सकारात्मक बदल झाल्यानंतरच याबाबत विचार व्हावा, असे या पक्षाचे म्हणणे आहे.
अद्याप शरिफ यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथही घेतली नाही, त्यांना एवढय़ातच भारत-भेटीचे निमंत्रण देणे म्हणजे खूप घाई होत असल्याचे उपाध्यक्ष बलबीर पुंज यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पाकिस्तानबाबत ‘थांबा आणि वाट पाहा,’ असे धोरण ठेवले पाहिजे. भारतासंबंधी त्यांच्यात काही सकारात्मक बदल दिसले तर त्यांना निमंत्रणे देणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
सीमावादावरील तोडग्यासाठी अधिक प्रयत्न आवश्यक
चीन सैन्याने लडाखमध्ये नुकत्याच केलेल्या घुसखोरीवरून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. या पाश्र्वभूमीवर सीमाप्रश्न तातडीने सोडवण्यासाठी दुपटीने प्रयत्न करण्याची अधिक गरज असल्याचे मत चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. लडाखमधील घुसखोरीनंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिक सुधारण्यासाठी तसेच सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी योग्य वातावरणनिर्मितीसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असून सामंजस्याने हा तिढा सोडवायला हवा, असे चीनच्या परराष्ट्र खात्याच्या माहिती विभागाचे संचालक आणि प्रवक्ते क्वीन गँग यांनी म्हटले.
मनमोहन सिंग यांना शपथविधीसाठी निमंत्रित करणार
तिसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणाऱ्या नवाझ शरीफ यांनी शपथविधी समारंभासाठी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. मनमोहन सिंग शपथविधी समारंभासाठी आल्यास आपल्याला खूप आनंद होईल, असे नवाझ शरीफ यांनी सोमवारी सांगितले. पत्रकारांशी याबाबत बोलताना नवाझ शरीफ म्हणाले की, भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी रविवारी फोनवरून दीर्घ चर्चा केली.
First published on: 14-05-2013 at 03:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will invite manmohan singh to my oath taking ceremony nawaz