नवी दिल्ली : ‘राज्यघटनेच्या रक्षणासाठी आपला पक्ष सर्व समविचारी पक्षांसह काम करण्यास तयार आहे,’ असे सांगून काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीची गरज अधोरेखित केली.

केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी सांगितले की, हे सरकार कायदेमंडळ (संसद), कार्यपालिका (प्रशासन), न्यायपालिका लोकशाहीच्या तीनही स्तंभांना उद्ध्वस्त करत आहे. ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात काँग्रेसचे सोनिया यांनी नमूद केले, की लोकशाही आणि लोकशाहीतील उत्तरदायित्वाचा या सरकारला तिरस्कार वाटतो. ही अस्वस्थ करणारी बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आचरण त्यांच्या शब्दांपेक्षा जास्त स्पष्टपणे दिसते, त्यातील सद्यस्थितीतील विरोधाभास भारतीयांना समजला आहे.

आमचा लढा जनहितार्थ आहे. जनतेच्या हक्कांच्या रक्षण करण्यासाठी आहे. प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेस आपले कर्तव्य समजून समविचारी पक्षांसोबत काम करण्यास तयार आहे. संसदेच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनादरम्यान, आपण सर्वानी पाहिलं, की सरकारच्या डावपेचांमुळे संसद ठप्प झाली, असे त्यांनी म्हटले आहे.

रिजिजू, धर्मेद्र प्रधान यांच्याकडून प्रत्युत्तर

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि धर्मेद्र प्रधान यांनी मंगळवारी सोनिया गांधी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. उच्च स्तरावरून केले गेलेले हे अनैतिक व भ्रामक दावे आहेत. पंतप्रधान मोदींविषयी द्वेषाचे हे परिपूर्ण बोलके उदाहरण आहे, अशी टीका त्यांनी केली. रिजिजू यांनी ‘ट्विटर’वरून नमूद केले, की सोनिया गांधी लोकशाहीबद्दल व्याख्यान देत आहेत? काँग्रेसचे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याबाबत विधान हे अत्यंत अनैतिक व दिशाभूल करणारे आहे. पराकोटीचा मोदी द्वेष, चुकीच्या गोष्टींवर भर देणारी ही टीका आहे. देश नव्हे तर काँग्रेसच राजकीय पेचात आहे.

Story img Loader