भारताने आमचा एक सैनिक मारला तर आम्ही त्यांचे तीन सैनिक मारू, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केली आहे. ते शुक्रवारी पाकिस्तानी संसदेत बोलत होते. यावेळी ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान विरोधात युद्ध छेडल्यास भारताला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. आगामी निवडणुकीत काश्मिरी जनतेचा पाठिंबा मिळविण्यासाठी भारताकडून नियंत्रण रेषेवरील परिस्थिती चिघळविण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच पाकिस्तानमध्ये दहशतवाद पसरविण्यात भारताचा हात आहे आणि त्याचे ठोस पुरावेही आमच्याकडे असल्याचा दावा आसिफ यांनी केला. पाकमधील दहशतवादामागे असणारा भारताचा सहभाग उघड करण्यासाठी आम्ही यासंदर्भातील डोझियर कागदपत्रे आणि व्हिडिओ संयुक्त राष्ट्रसंघ आणि अन्य देशांना पाठविली आहेत, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, भारत चीन-पाकिस्तान आर्थिक पट्टा (इकोनॉमिक कॉरिडोअर) निर्मितीतही भारत अडथळे आणत असल्याचा आरोप ख्वाजा आसिफ यांनी केला. या आर्थिक पट्ट्यामुळे पाकिस्तानमध्ये आमुलाग्र बदल घडतील, अशी भीती भारताला वाटते. सद्यस्थितीत पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या भारतापेक्षा कमकुवत असला तरी इकोनॉमिक कॉरिडोअरच्या निर्मितीनंतर पाकिस्तान भारतापेक्षा अधिक शक्तिशाली होईल, असा दावाही आसिफ यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा