भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीप बेटांना भेट दिली. मोदींनी त्यांच्या या सहलीदरम्यानचे काही फोटो समाजमाध्यमांवर शेअर केले होते. भारत गेल्या काही महिन्यांपासून लक्षद्वीपचा आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून प्रचार करत असतानाच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी पुढाकार घेतल्यानंतर अनेकांचं लक्ष लक्षद्वीपकडे वळलं. परंतु, हे पाहून भारताच्या नैऋत्येला असलेल्या मालदीव या देशातील काही लोकांचा तिळपापड झाला. मालदीवमधील काही नागरिकांनी आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी भारताचा अपमान करणाऱ्या टिप्पण्या केल्या. यापैकी काही जण एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी भारतीय नागरिकांवरही वर्णद्वेषी टीका केली. त्यामुळे मालदीवला गेल्या काही दिवसांपासून भारतीय नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. मालदीवमधील मंत्र्यांच्या भारतावरील अपमानास्पद टीकेनंतर भारतात मालदीववर बहिष्कार टाकण्याबाबत चर्चा सुरू झाली. समाजमाध्यमांवर बॉयकॉट मालदीव असा हॅशटॅग काही दिवस ट्रेंडिंगमध्ये होता. या वादात सामान्य नागरिकांसह राजकारणी, खेळाडू आणि चित्रपट कलाकारांनीदेखील उडी घेतली. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. परिणामी मालदीव सरकारने दोन पावलं माघार घेतली. मालदीवमधील खासदार आणि काही मंत्र्यांनी भारतीयांची माफी मागितली. त्याचबरोबर मालदीवच्या पर्यटन विभागानेदेखील अधिकृत निवेदन जारी करून भारताची माफी मागून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या सगळ्या घडामोडींमुळे भारतात मालदीवविरोधी वातावरण तयार झालं आहे. त्याचबरोबर लक्षद्वीपचा गाजावाजा सुरू झाला आहे. मालदीव हा भारताच्या नैऋत्येला ७२० किलोमीटर अंतरावर हिंदी महासागरात असलेला छोटा देश आहे. तिरुवनंतपुरमपासून ७२० किमी, तर लक्षद्वीपपासून ७५४ किमी अंतरावर असणारा आणि तब्बल १,९९२ बेटांचा देश आहे. या देशाची लोकसंख्या केवळ सव्वापाच लाख इतकी आहे. या देशाचं क्षेत्रफळ गोव्यापेक्षा कमी आणि भारतातल्या एखाद्या तालुक्याइतकी लोकसंख्या आहे.

Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
road along Seawoods creek flamingo habitat was recommended for closure
फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
Shortage of public toilets in Pune city
वानवा.. स्वच्छतागृहांची
municipality removed 125 construction that were obstructing Titwala-Shilphata bypass road
Titwala-Shilphata bypass road : टिटवाळा-शिळफाटा बाह्यवळण रस्ते मार्गातील अडथळे दूर
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
dubai visa policy
दुबईचा व्हिसा मिळवताना भारतीय पर्यटकांना अडचणी का येत आहेत? काय आहेत नवे नियम?

मालदीवचं पर्यटन भारतावर अवलंबून?

मालदीवची संपूर्ण अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे. त्यातही या देशात भारत, रशिया आणि चीनमधून सर्वाधिक पर्यटक येतात. मालदीव पर्यटन विभागाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार गेल्या वर्षभरात या देशाला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये सर्वाधिक पर्यटक हे भारतीय होते. १३ डिसेंबर २०२३ पर्यंत १७,५७,९३९ पर्यटकांनी मालदीवला भेट दिली. २०२२ च्या तुलनेत यात १२.६ टक्के वाढ झाली आहे. २०२२ मध्ये ही संख्या १५ लाखांच्या आसपास होती. २०२३ मध्ये मालदीवला भेट देणाऱ्या १७.५७ लाख पर्यटकांपैकी २,०९,१९८ पर्यटक हे भारतीय होते. तर २,०९,१४६ रशियन आणि १,८७,११८ चिनी पर्यटकांनी मालदीवला भेट दिली होती. याचाच अर्थ गेल्या वर्षी मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांपैकी ११.९० टक्के पर्यटक हे भारतीय होते.

मालदीवने डोळे वटारल्यावर भारताच्या भूमिकेत बदल

मालदीव हा कुठल्याच बाबतीत भारताचा स्पर्धक नाही. परंतु, अलीकडच्या काळात उभय देशांमध्ये संबंध ताणले गेले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हा देश भारताकडे डोळे वटारून पाहतोय. मालदीवमधील इब्राहिम सोलिह यांचा पराभव करून चीनधार्जिणे मोहम्मद मुइज्जू हे मालदीच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. सोलिह हे कायमच भारताच्या बाजूचे होते, असं मानलं जातं. मात्र, मुइज्जू हे मालदीवचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी भारताविरोधात कुरापती सुरू केल्या आहेत. भारताने मालदीवच्या भूमीवरून आपलं सैन्य माघारी बोलवावं हे मुइज्जू यांचं सत्तारूढ झाल्यानंतरचं पहिलं वक्तव्य होतं. तेव्हापासून उभय देशांमधले संबंध ताणायला सुरुवात झाली. तसेच मुइज्जू यांची चीन आणि टर्कीशी (तुर्कस्तान) जवळीक वाढू लागली आहे, त्यामुळे भारतानेही आता मालदीवबाबतच्या भूमिकांचा पुनर्विचार केल्याचं दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप भेटीद्वारे त्याची चुणूक दाखवली. त्याला भारतीय नागरिकांचाही भरभरून पाठिंबा मिळू लागला आहे. बॉयकॉट मालदीवसह भारतीय नागरिक लक्षद्वीपचा प्रचार करू लागले आहेत. बॉलीवूड कलाकार यामध्ये आघाडीवर आहेत. हेच बॉलीवूड कलाकार पूर्वी सातत्याने मालदीववारी करत असत. त्यामुळे त्यांनीच आता मालदीवऐवजी लक्षद्वीपकडे मोर्चा वळवल्याने मालदीवला मोठा फटका बसेल असं चित्र दिसतंय. परंतु, लक्षद्वीप हे मालदीवला पर्याय ठरू शकतं का? लक्षद्वीपमध्ये मालदीवसारख्या सोयी आणि पायाभूत सुविधा आहेत का? यापैकी कोणत्या पर्यटनस्थळी जाणं अधिक सोपं आणि कमी खर्चिक आहे? असे प्रश्न भारतीय नागरिकांना पडले आहेत.

हे ही वाचा >> भारतीयांनी मालदीवकडे फिरवली पाठ; भविष्यात भारतीय पर्यटक मालदीवला भेट देणार का?

लक्षद्वीपमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणं गरजेचं

लक्षद्वीप मालदीवला पर्याय ठरू शकतं का? या प्रश्नावर ईशा टूर्सचे प्रमुख आत्माराम परब म्हणाले, भारतीय नागरिकांची मालदीव आणि लक्षद्वीपबाबतची सध्याची भूमिका योग्य आहे. परंतु, सध्या लक्षद्वीपमध्ये मालदीवसारख्या पायाभूत सुविधा नाहीत. लक्षद्वीपला जाणं, तिथे फिरणं हे मालदीवला फिरण्यापेक्षा काही प्रमाणात अवघड आहे. अर्थातच, लक्षद्वीप भारतातलं बेट असल्यामुळे तिथे जाण्यासाठी कमी खर्च येतो, तसेच तिथे जाण्याची प्रक्रियादेखील सोपी आहे. परंतु, तिथल्या प्रत्येक बेटांवर पोहोचणं अवघड आहे. ज्या दर्जाच्या सुविधा आजच्या घडीला मालदीवमध्ये पुरवल्या जातात, त्याच्या १० टक्के सुविधादेखील लक्षद्वीपमध्ये नाहीत. सध्या लक्षद्वीपमधील बेटांवर जाण्यासाठी दोनच पर्याय आहेत. यापैकी पहिला आणि बहुसंख्य प्रवासी वापर करतात तो पर्याय म्हणजे कोचीनवरून जाणाऱ्या बोटीने प्रवास करणे. ही क्रूझसेवा तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून चालवली जाते. या क्रूझने प्रवाशांना दिवसभर लक्षद्वीपमध्ये फिरवलं जातं आणि प्रवासी रात्री त्या क्रूझवर राहू शकतात. प्रवासी रात्री क्रूझवरील त्यांच्या खोलीत झोपलेले असताना क्रूझचा दुसऱ्या एका बेटावरून दुसऱ्या बेटाच्या दिशेने प्रवास चालू असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासी नव्या बेटावर पोहोचतात. परंतु, प्रवाशांना एका ठराविक बेटावर जायचं असेल तर बोटीशिवाय दुसरा पर्याय नाही. मालदीवमध्ये मात्र जेट्सचा पर्याय आहे. विमानानेसुद्धा वेगवेगळ्या बेटांवर जाता येतं.

लक्षद्वीप मालदीवची जागा घेऊ शकतं?

परब म्हणाले, मालदीवमधील स्थिती लक्षद्वीपच्या तुलनेत थोडी वेगळी आहे. सध्याच्या घडीला लक्षद्वीप हे मालदीवची जागा घेऊ शकत नाही. मालदीवमध्ये ‘एक बेट एक रिसॉर्ट’ अशी संकल्पना आहे. तिथले रिसॉर्ट उच्च दर्जाचे आहेत. असे रिसॉर्ट लक्षद्वीपमध्ये तयार झाले तर त्याचा आपल्या देशाच्या पर्यटनाला नक्कीच फायदा होईल. देशातल्या पर्यटकांना आणि आम्हा पर्यटन कंपन्यांना सर्वाधिक आनंद होईल. परंतु, लक्षद्वीपमध्ये तशा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी तीन ते चार वर्षे लागू शकतात. शासनाने फास्ट ट्रॅकवर या गोष्टी केल्या, रिसॉर्ट उभारायला घेतली, मदत केली, मोठमोठे उद्योगपती, हॉटेल व्यावसायिक या क्षेत्रात उतरले तर तीन वर्षांहून कमी काळात तिथे अशा पायाभूत सुविधा उभारल्या जाऊ शकतात. भारतातील ताज हॉटेल्ससारखी कंपनी लक्षद्वीपमध्ये उतरली तर सोन्याहून पिवळं होईल.

मालदीव प्रवासाबाबतची माहिती देताना आत्माराम परब म्हणाले, तिथे सध्या पर्यटकांसाठी २५० ते ३०० छोटे एअरक्राफ्ट्स आणि सी प्लेन्स आहेत. केवळ ८ ते १० प्रवासी बसून प्रवास करू शकतील असे छोटे एअरक्राफ्ट्सदेखील तिथे उपलब्ध आहेत. २० ते ३० प्रवाशांना घेऊन जाणारे एअरक्राफ्ट्सही उपलब्ध आहेत. याशिवाय असंख्य बोटी आणि क्रूझचे पर्यायही तिथे आहेत. हे सगळं लक्षद्वीपमध्ये निर्माण करायला वेळ लागेल. त्यामुळे मला वाटतं की सध्या लक्षद्वीप मालदीवची जागा घेऊ शकत नाही. परंतु, मालदीवचे काही मंत्री जे काही बोलले त्याविरोधात आपण बोललंच पाहिजे. तसेच कारवाईदेखील झाली पाहिजे. एक यात्रा कंपनी चालवणारी व्यक्ती म्हणून मलाही असं वाटतं की, आपण आपल्या पर्यटकांना तिथे घेऊन जाऊ नये. मालदीवमधील मंत्री जर आपल्या देशाचा अपमान करत असतील तर ते सहन केलं जाणार नाही.

हे ही वाचा >> मालदीवच्या वादात आता टाटांची एन्ट्री, लक्षद्वीपसाठी बनवला जबरदस्त प्लान

मुंबईवरून लक्षद्वीपला जाण्यासाठी क्रूझचा पर्याय

मुंबईसह महाराष्ट्रातील पर्यटकांना लक्षद्वीपवारी करायची असेल तर त्यांच्याकडे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, याबाबतची माहिती देताना आत्माराम परब म्हणाले, आपल्याकडे विमानसेवा उपलब्ध आहे. लक्षद्वीपवरील आगाती विमानतळ तयार झाल्यापासून तिकडे विमानाने जाणं अधिक सोपं झालं आहे. तसेच सध्या मुंबई आणि महाराष्ट्रातील पर्यटकांना लक्षद्वीपला जाण्यासाठी कॉर्डेलिया या क्रूझ कंपनीचं जहाज उपलब्ध आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मुंबई ते लक्षद्वीप, मुंबई ते कोची अशा क्रूझ फेऱ्या सुरू केल्या आहेत. कोचीनवरून निघणारी बोट आणि मुंबईवरून निघणाऱ्या क्रूझचा विचार करता आपण दररोज ५०० ते ६०० पर्यटकांना लक्षद्वीपला घेऊन जाऊ शकतो. परंतु, मालदीवला एका दिवसाला ६ ते १० हजार पर्यटक जाऊ शकतात. त्यामुळे सध्या जितके भारतीय पर्यटक मालदीवला जातात, त्याच्या केवळ १० टक्के पर्यटक लक्षद्वीपला जाणं पसंत करतात.

लक्षद्वीपला जाणाऱ्या पर्यटकांना सावध करताना आत्माराम परब म्हणाले, “सध्या देशात मालदीवबद्दल जे वातावरण तयार झालं आहे, लोक मालदीववर संतापले आहेत; त्यामुळे अचानक लक्षद्वीपला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. परंतु, यामुळे तिथले स्थानिक टूर ऑपरेटर्स याचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यापासून पर्यटकांनी सावध असणं आवश्यक आहे.” यासह परब म्हणाले, लक्षद्वीपपेक्षा अंदमान आणि निकोबार बेटे मालदीवला पर्याय ठरू शकतात. कारण आजच्या घडीला लक्षद्वीपपेक्षा अधिक सोयीसुविधा अंदमान-निकोबारमध्ये आहेत.

इशा टूर्सचे सर्वेसर्वा म्हणाले, पायाभूत सुविधांचा विचार केल्यास दुर्दैवाने मालदीवला सध्यातरी आपल्याकडे पर्याय नाही. कारण पर्यटकांना जे हवं आहे किंवा मालदीवमध्ये जे मिळतंय ते लक्षद्वीपमध्ये आत्ता नाही. परंतु, लक्षद्वीपला निसर्गाने भरभरून दान दिलं आहे. त्यामुळे नैसर्गिक सौंदर्याचा विचार केल्यास लक्षद्वीप नक्कीच मालदीवपेक्षा उजवं आहे. तिथले किनारे स्वच्छ आहेत. तिथले स्थानिक लोक सगळी बेटं स्वच्छ ठेवतात. लक्षद्वीपमधील मरीन लाईफ पाहण्यासारखं आहे, तिथे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधने आहेत.

हे ही वाचा >> गुगल सर्चमध्येही लक्षद्वीपने २० वर्षांचा रेकॉर्ड मोडला

मालदीवला जाणं खर्चिक

आत्माराम परब यांनी सांगितलं की, एका माणसाला ५० हजार रुपये ते २ लाख रुपयांमध्ये मालदीववारी करता येते. अलीकडच्या काळात तिकडे भारतीय रेस्तराँदेखील सुरू झाले आहेत, त्यामुळे तिकडे भारतीय जेवणही मिळतं. त्यामुळे भारतीय पर्यटकांना खाण्यापिण्याची अडचण येत नाही. परदेशातील इतर बेटांवर जाण्यासाठी जो खर्च होतो त्या तुलनेत मालदीव परवडतं. बहुसंख्य नवविवाहित जोडपी हनिमूनसाठी मालदीवची निवड करतात. इतर पर्यटनस्थळांप्रमाणे मालदीवला समूहाने जाणारे फार कमी असतात. दुसऱ्या बाजूला, ३५ हजार रुपये ते एक लाख रुपये इतक्या खर्चात एका व्यक्तीला लक्षद्वीप सहल करता येते. मालदीवमध्ये अनेक उत्तमोत्तम वॉटर व्हिला आहेत. मालदीव हा खाडी प्रदेश असल्याने तिथल्या समुद्रकिनाऱ्यांवर मोठमोठ्या लाटा येत नाहीत. भरतीच्या दिवसांमध्येदेखील तिथल्या समुद्रकिनाऱ्यांवर लोक फिरू शकतात. आपल्याकडे अंदमानमध्ये तशी स्थिती आहे. मालदीवमधील समुद्रकिनाऱ्यांवर असे काही कॉटेज आहेत, जिथे भरतीच्या काळात पाणी रिसॉर्ट आणि हॉटेलांपर्यंत येतं. परंतु, तिथल्या कॉटेजमधील फ्लोरिंग हे काचेचं असतं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बेडखाली मासे पोहत असल्याचं पाहायला मिळतं. अशा उच्च दर्जाच्या आकर्षक गोष्टी तिथे असल्यामुळे पर्यटकांना मालदीवला जायला आवडतं. आपण लक्षद्वीपमध्येही अशा गोष्टी करू शकतो, तशी नैसर्गिक संसाधने लक्षद्वीपमध्ये आहेत.

आपल्या पंतप्रधानांनी लक्षद्वीपवारी केली आणि त्याचवेळी मालदीवच्या मंत्र्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करून आपल्याच पायावर कुऱ्हाड पाडून घेतली आहे आणि त्यानंतर आता भारतीयांचं मालदीवबद्दल तयार झालेलं नवं मत पाहता मालदीव क्लीनबोल्ड झालंय असं आपण म्हणू शकतो. परंतु, आपण असं समजू नये की, आपण मालदीववर बहिष्कार टाकला म्हणजे त्यांचं खूप मोठं नुकसान होईल, कारण ते पूर्णपणे आपल्यावर अवंलबून नाहीत. युरोप आणि इतर देशातले पर्यटकही तिकडे जातात. करण मालदीव सुंदर आहे. सध्या भारतीय पर्यटक मालदीवऐवजी लक्षद्वीपची निवड करत आहेत, हे खूप चांगलं काहीतरी घडतंय. हे परिवर्तन आहे. कोणीतरी भारताची खिल्ली उडवत असेल तर भारतातून अशा प्रकारची प्रतिक्रिया उमटू शकते, हे देखील या माध्यमातून जगाला कळलं असेल; जे होतं ते भल्याकरता.

हे ही वाचा >> लक्षद्वीप की मालदीव? दोन्हीपैकी सरस कोण? जाणून घ्या आकडेवारी काय सांगते?

भारताचा मालदीवला शह

दरम्यान, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांनीदेखील यावर त्यांचं मत मांडलं. चौबळ म्हणाल्या, लक्षद्वीप ही बेटं खूप सुंदर आहेत. आपल्याकडील पायाभूत सुविधा पूर्वी तेवढ्या सक्षम नव्हत्या. मालदीवला जितके पर्यटक नेता येतात तितके पर्यटक लक्षद्वीपला नेता येत नव्हते. परंतु, आता तिथे आगाती हे नवीन विमानतळ बांधण्यात आलं आहे. तिथे आणखी काही पायाभूत सुविधा विकसित केल्या तर लक्षद्वीप हे मालदीवच्या बरोबरीचं पर्यटन स्थळ होईल. येत्या काळात मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक लक्षद्वीपला जातील. तेथील जैवविविधता खूप सुंदर आहे. स्कुबा डायव्हिंगसह इतर अनेक गोष्टींसाठी लक्षद्वीप उत्तम आहे. लक्षद्वीपमधील समुद्रकिनारे खूप सुंदर आहेत. परंतु, मालदीवला १५० हून अधिक रिसॉर्ट आहेत, तितके रिसॉर्ट लक्षद्वीपमध्ये नाहीत. त्यामुळे सुखसोयींच्या बाबतीत दोन्ही पर्यटनस्थळांची तुलना होऊ शकत नाही. मालदीवप्रमाणे लक्षद्वीपमध्ये मोठ्या संख्येने रिसॉर्ट, हॉटेल्स आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण केल्या तर लक्षद्वीप हे मालदीवला पर्याय ठरू शकतं. आपलं सरकार आता काही खासगी कंपन्यांबरोबर मिळून तिथे पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. बदलत्या भारतात या गोष्टी खूप सोप्या आहेत. मालदीवमध्ये ज्या गोष्टी आत्ता आहेत, त्या लक्षद्वीपमध्ये निर्माण करायला आपल्याला फारसा वेळ लागणार नाही. दरवर्षी केसरी टूर्सच्या माध्यमातून १,००० हून अधिक भारतीय पर्यटकांना मालदीव सफर घडवून आणली जाते. केसरी टूर्सकडून पूर्वी लक्षद्वीप सहली आयोजित केल्या जात नव्हत्या. परंतु, आगाती विमानतळ सुरू झाल्यापासून आपण पर्यटकांना लक्षद्वीपला घेऊन जात आहोत. फिरण्यासाठी लक्षद्वीप हे मालदीवपेक्षा खूप स्वस्त आहे. कमी खर्चात मालदीवइतकेच सुंदर समुद्रकिनारे आपण लक्षद्वीपमध्ये पाहू शकतो.

झेलम चौबळ म्हणाल्या, लक्षद्वीपसह इतर बेटांच्या माध्यमातून आपण नक्कीच मालदीवला पर्याय देऊ शकतो. परंतु, आपली बेटे मालदीव होऊ शकत नाहीत. केसरी टूर्सच्या माध्यमातून आम्ही आता लक्षद्वीपच्या सहली सुरू करत आहोत. कारण लक्षद्वीपच्या माध्यमातून खूप कमी खर्चात पर्यटकांना मालदीवरसारखाच अनुभव मिळतो. दोन्हीकडे सारखेच समुद्रकिनारे पाहायला मिळतात. मालदीव हा देश पर्यटनावर अवलंबून आहे आणि भारतातून मोठ्या प्रमाणात पर्यटक मालदीवला जातात. याचा अर्थ असा नव्हे की, आपण त्या देशावर बहिष्कार टाकल्याने ते पूर्णपणे अडचणीत येणार नाहीत. पंतप्रधानांच्या लक्षद्वीप सहलीने मालदीवला शह दिला आहे, असं आपण म्हणू शकतो. परंतु, भारत कधीच इतरांचं वाईट चिंतत नाही. परंतु, कोणीही भारताबद्दल वाईट बोललं तर आपला देश शांत बसत नाही, हे मालदीव प्रकरणानंतर जगाच्या लक्षात आलं असेल. भारतासह रशिया आणि युरोपातील पर्यटकही मालदीवला जातात. त्यामुळे मालदीव मोठ्या अडचणीत सापडणार नाही. परंतु, भारताबद्दल कोणीतरी काहीतरी वाईट बोललं तर भारतीय नागरिकांकडून, भारताकडून अशी प्रतिक्रिया येऊ शकते हे जगाला समजलं असेल.

Story img Loader