भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये भगवा, पांढरा, हिरवा आणि निळा असे रंग आहेत. आपण या झेंड्याला तिरंगा असंही म्हणतो या तिरंग्यातून मोदी सरकार हिरवा रंग हटवणार आहेत का? असा सवाल AIMIM चे खासदार असदउद्दीन ओवैसी यांनी विचारला आहे. संसदेत बोलत असताना त्यांनी हा प्रश्न विचारला आहे तसं मोदी सरकारला हिरव्या रंगाचं एवढं का वावडं आहे? असंही ओवैसी यांनी विचारलं आहे.
सरकारने जर तिरंग्यातून हिरवा रंग काढून टाकला तर ते कलिंगडावरही बंदी घालणार का? फक्त नागपूरचं संत्रंच खाल्लं जावं असा आदेश काढणार का? असेही प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केले. आपल्या देशातल्या लोकसंख्येचा भाग ज्या अल्पसंख्याकांनी व्यापला आहे त्या अल्पसंख्याक वर्गाबाबत आम्ही राष्ट्रपतींच्या भाषणात एक ओळही ऐकली नाही असंही ते म्हणाले. तसंच मुस्लिमांना कायमच हिरव्या रंगाशी जोडलं जातं तुम्ही कशा कशावर बंदी घालणार असाही प्रश्न त्यांनी विचारला.
चीनच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार का? बिल्किस बानोला न्याय मिळणार का? जो अर्थसंकल्प केंद्र सरकारने नुकताच सादर केला त्यातही अल्पसंख्याक वर्गाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं आहे. अल्पसंख्याक खात्यासाठी करण्यात आलेली तरतूद ही गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८ टक्के कमी आहे असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.
भाजपा आणि काँग्रेसवर ओवैसी यांनी कडाडून टीका केली. काँग्रेस आणि भाजपा असे दोन पक्ष आहेत ज्यांनी अल्पसंख्याक या शब्दाला जन्म दिला. जे लोक प्रचंड संपत्ती घेऊन आपल्या देशातून पळून गेले आहेत त्या यादीत मुघलांचं नाव आहे का बघा. पण तुम्ही त्याबाबत कधीही काहीही बोलणार नाही, सोयीस्कर मौन बाळगणार असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.
आपल्या भाषणात पुढे ओवैसी म्हणाले की जे लोक पैसे खाऊन पळून गेले त्यात एकही नाव मुस्लिम नाही. हिंडनबर्ग प्रकरण भारतात झालं असतं तर त्यावर यूएपीए लागला असता अशीही टीका त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा गांधींचं नाव घेतता, त्यांना वाटत असतं की आपण जाऊन येईपर्यंत धर्मांमध्ये दोन गट पडायला नकोत असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.