राफेल प्रकरणावर लोकसभेत झालेल्या चर्चेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘हिंमत असेल तर सभागृहात येऊन उत्तर द्या’, असे थेट आव्हान दिल्यामुळे मोदी शुक्रवारी सभागृहात राफेलवर सविस्तर बोलतील, अशी शक्यता आहे.
केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या चर्चेला उत्तर देणार होत्या. मात्र, त्यापूर्वीच गुरुवारी लोकसभा तहकूब झाली. त्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने राफेलबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा मुकाबला खुद्द मोदीच करतील, असे मानले जात आहे.
राफेलच्या मुद्दय़ावर राहुल गांधी यांनी घेतलेल्या आक्षेपांवर मोदी सरकारची बाजू मांडताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना एकहाती किल्ला लढवावा लागला होता. जेटली हे राज्यसभेचे सदस्य असून त्यांना लोकसभेत सरकारच्या वतीने बोलावे लागले. लोकसभेत बुधवारी चर्चेच्या वेळी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामनही उपस्थित होत्या, तरीही जेटलींनी युक्तिवाद केल्याने केंद्र सरकारवर नामुष्की ओढवली होती. लोकसभेत भाजपकडे प्रचंड संख्याबळ असूनही मोदी सरकारला राज्यसभेतून सदस्य आयात करावा लागतो. यावरूनच भाजपमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असल्याचे दिसते, अशी बोचरी टीका तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी केली. त्यामुळे गुरुवारी राफेलवरील चर्चेला संरक्षणमंत्री उत्तर देणार होत्या. मात्र आता मोदीच सभागृहात येऊन विरोधकांचा सामना करतील, अशी शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी गुरुवारी दिवसभर पंजाबच्या दौऱ्यावर होते पण, बुधवारी ते दिल्लीत होते. इतकेच नव्हे तर दुपारी दीड वाजेपर्यंत ते संसदेतील कार्यालयात होते. राफेलवरील चर्चा दुपारी दोन वाजता सुरू झाली, पण तोपर्यंत ते संसदेतून निघून गेले होते. हाच धागा पकडत राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली. राफेलवर मोदींना मी तीन प्रश्न विचारले, पण त्यांनी उत्तरे देण्याची हिंमत दाखवलेली नाही. चर्चेवेळी सभागृहात न येता ते कार्यालयात लपून बसले आहेत, अशी वैयक्तिक टिप्पणी केल्यामुळेही कदाचित मोदी राफेलवर सभागृहात उत्तर देतील असे मानले जाते.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या वकिली युक्तिवादानंतरही काँग्रेसने राफेलचा मुद्दा सोडलेला नाही. जेटलींच्या उत्तरावर राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन राफेलच्या किमतीची उकल केली. जेटली यांनी राफेलच्या ३६ विमानांचे कंत्राट ५८ हजार कोटींचे होते, असे सभागृहात सांगितले. म्हणजेच प्रति विमान किंमत १६०० कोटी इतकी होते. जेटलींनी अप्रत्यक्षपणे राफेल विमानाची किंमत जाहीर केल्याचे सांगत राहुल यांनी भाजपवर हल्लाबोल केला. यूपीएच्या काळातील राफेलची ५०० कोटी ही किंमत सुसज्ज विमानांचीच होती पण, मोदी सरकारने त्याच सुसज्जतेची किंमत १६०० कोटींवर नेली. त्यामुळे भाजपने किमतीच्या फरकांचे केलेले समर्थन फोल ठरते, असा दावा गुरुवारी काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकार परिषदेत केला. काँग्रेस सातत्याने भाजपवर राफेल मुद्दय़ावरून हल्लाबोल करत असल्यामुळे पंतप्रधान या प्रकरणावर भाष्य करण्याची शक्यता आहे.