आगामी लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? पुन्हा भाजपा सरकार सत्तेवर येणार की नव्याने स्थापन झालेल्या इंडिया आघाडीला सत्तेची खुर्ची मिळणार? कोणाच्या किती जागा निवडून येणार? राज्या-राज्यात कोणाच्या बाजूने लोकांचा कौल आहे आदी विविध विषयांवर गेल्या काही दिवसांपासून चर्चा चालू आहे. या चर्चांमध्ये आता अनेक माध्यमांचे अंदाज समोर येऊ लागले आहेत. इंडिया टुडे मूड ऑफ नेशनचा अंदाज आता समोर आला असून त्यानुसार कोणाच्या पारड्यात किती जागा मिळणार याचे अंदाज बांधण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया टुडेचा ‘द मूड ऑफ द नेशन्स फेब्रुवारी २०२४’ हा सर्व्हे सर्व लोकसभेतील ३५,८०१ प्रतिसादकर्त्यांच्या आधारावर बेतलेला आहे. १५ डिसेंबर २०२३ ते २८ जानेवारी २०२४ या काळात हे सर्वेक्षण केले गेले.

भाजपाच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA ला पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यात यश येणार आहे. परंतु, यंदाच्या निवडणुकीत एनडीए ४०० पार करू शकणार नाही, असं अंदाजात वर्तवण्यात आलं आहे.

हेही वाचा >> इंडिया आघाडीला महाराष्ट्रात ४८ पैकी २६ जागा मिळणार; वाचा सर्व्हे काय सांगतात?

आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर, भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ३३५ जागा जिंकू शकेल. सरकार स्थापनेसाठी २७२ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपा आरामात सत्ता स्थापन करू शकेल. परंतु, एनडीए या निवडणुकीत १८ जागांवर अपयशी होऊ शकते, याचा फायदा इंडिया आघाडीला होणार असल्याचंही सर्वेतून समोर आलं आहे.

इंडिया आघाडीला किती जागा मिळणार?

आगामी लोकसभा निवडणूक NDA विरूद्ध INDIA आघाडी अशी होणार आहे. त्यामुळे एनडीएला ३३५ जागा मिळणार असून इंडिया आघाडीला १६६ जागांवर समाधान मानावं लागणार असल्याची चिन्हे आहेत.

पक्षनिहाय विचार केल्यास भाजपाला ५४३ जागांपैकी ३०४ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसला ७१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उर्वरित १६९ जागांवर स्थानिक पक्ष आणि अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.

मूड ऑफ नेशनमधील इतर महत्त्वाचे मुद्दे

  • राम मंदिराचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जात असल्याचं ४२ टक्के लोकांनी सांगितलं.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरात भारताची प्रतिमा उंचावली असल्याचं १९ टक्के लोकांनी मान्य केलं.
  • कोविड-१९ साथीच्या रोगात एनडीए सरकारने चांगलं काम केल्याचं २० टक्के लोकांनी म्हटलं आहे.
  • बेरोजगारी ही एक महत्त्वाची चिंता असून १८ टक्के प्रतिसादकर्त्यांनी हे वर्तमान सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचंही म्हटलं आहे.
  • १९ टक्के लोकांसाठी सतत वाढत जाणारी महागाई हा चिंतेचा विषय ठरला आहे.
  • मोदी सरकारने यशस्वीपणे भ्रष्टाचार कमी केला आहे याबात दुमत आहे. ४६ टक्के लोकांनी भ्रष्टाचार कमी झाल्याचं म्हटलं आहे तर ४७ टक्के लोकांनी भ्रष्टाचार कमी झाला नाही असं म्हटलं आहे.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will modis dream of 400 seats be broken how many seats will india aghadi get read what opinion polls predict sgk