शेजारी देशांशी संबंध हा संवेदनक्षम विषय आहे, मात्र देशाला ज्यांच्यापासून धोका आहे अशा देशांविरुद्ध भारत कमकुवत भूमिका घेणार नाही, असे नवे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भारत आणि शेजारी देश यांच्यातील संबंध हा संवेदनक्षम विषय आहे, असे ते म्हणाले.
देशाच्या संरक्षण मंत्रालयाची धुरा आपल्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी आपल्याला काही वेळ द्यावा. या मंत्रालयाची माहिती करून घेण्यासाठी काही कालावधी लागेल. भारत बळकट व्हावा यासाठी जे आवश्यक आहे ती पावले उचलण्यात येतील, असेही पर्रिकर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यानंतर सोमवारी सुरेश प्रभू (रेल्वे), मनोहर पर्रिकर (संरक्षण), अरुण जेटली (माहिती-प्रसारण), जे. पी. नड्डा (आरोग्य) या मंत्र्यांनी आपल्या खात्यांचे सूत्रे हाती घेतली.
या मंत्र्यांसमवेतच डी. व्ही. सदानंद गौडा, वाय. एस. चौधरी, जयंत सिन्हा, बाबुल सुप्रियो, हर्षवर्धन, विजय सांपला, व्ही. के. सिंग आणि बंडारू दत्तात्रेय या अन्य १२ मंत्र्यांनी आपल्या खात्यांचा पदभार स्वीकारला.
संरक्षण दलातील व्यवहार पारदर्शक करणार
संरक्षण दलासाठी लागणाऱ्या खरेदीची प्रक्रिया पारदर्शक आणि तितकीच वेगवान असेल. सोमवारी पर्रिकर यांनी संरक्षण सचिव आर. के. माथूर आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ घोषणेत सूर मिसळून पर्रिकर यांनी, शक्य तितके देशांतर्गत उत्पादन करण्यावर भर दिला. जी पावले उचलण्यात येतील त्यामध्ये पारदर्शकता असेल आणि प्रक्रिया वेगाने केली जाईल आणि ती आपली खासियत आहे, असे ते म्हणाले. गेल्या १० वर्षांत खरेदीच्या प्रक्रियेला विलंब लागला, ही दुर्दैवी बाब असल्याचे ते म्हणाले.
रेल्वे सुरक्षा, ग्राहक सेवा यांना प्राधान्य -प्रभू
रेल्वे सुरक्षा आणि ग्राहक सेवा यांना आपण प्राधान्य देणार असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. रेल्वेकडे पुरेपूर क्षमता असून त्याचा योग्य प्रकारे वापर करावयास हवा, भूतकाळात रेल्वेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. रेल्वेसेवेची स्थिती सुधारणे गरजेचे असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे ग्राहक सेवा आणि रेल्वेची सुरक्षा या दोन गोष्टींना आम्ही प्राधान्य देणार आहोत. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
प्रसारमाध्यमांमधील बदलांची दखल
सध्या प्रसारमाध्यमांमध्ये अनेक बदल झाले असून आपल्या मंत्रालयाने या बदलांची दखल घेतली असून त्यानुसार जुळवून घेतले जाईल, असे माहिती आणि प्रसारणमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.
अरुण जेटली, माहिती-प्रसारण मंत्री
रोजगारनिर्मितीला प्राधान्य
रोजगारनिर्मिती आणि महागाईला आळा घालणे याला सरकारचे प्राधान्य आहे. वृद्धिदरात वाढ करण्याची प्रक्रिया वेग घेईल, पुढील वर्षी ६-६.५ टक्के वृद्धिदर गाठणे अपेक्षित आहे.
जयंत सिन्हा, अर्थ राज्यमंत्री