देश नक्षलवादापुढे झुकणार नाही व हल्ले करणाऱ्यांना शिक्षा घडवल्याशिवाय राहणार नाही, असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज येथे सांगितले. कालच्या नक्षलवादी हल्ल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग आदींनी आज छत्तीसगडला भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते.
सुकमा जिल्ह्य़ात काल झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २७ जण ठार झाले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख, तर जखमींना पन्नास हजार रूपये मदत पंतप्रधानांनी जाहीर केली.
काँग्रेस भवन येथे पक्ष कार्यकर्त्यांपुढे बोलताना मनमोहन सिंग यांनी सांगितले की, आमचे नेते नंदकुमार पटेल, महेंद्र कर्मा, उदय मुदलियार यांनी या हल्ल्यात प्राणार्पण केल असून नक्षलवादापुढे झुकणार नाही.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले की, हल्लेखोरांचा माग काढला जाईल व त्यांना शिक्षा घडवली जाईल असे आश्वासन आपण सरकारच्या वतीने देशाला देत आहोत. ज्यांनी हा भ्याड हल्ला केला ते या भागातील विकासाची प्रक्रिया उधळून लावण्याच्या विचारांचे आहेत. आम्ही आव्हाने झेलली आहेत व हा हल्ला म्हणजे आम्हाला आव्हान आहे. असे असले तरी आम्ही पुढे जातच राहू.