खाणमालकांप्रती आपले धोरण मवाळ झाले असल्याच्या आरोपांचा इन्कार करतानाच जे खाणमालक बेकायदेशीर कृत्यांमध्ये अडकलेले आढळतील, त्यांना कदापि मोकळे सोडले जाणार नाही आणि कायद्यानुसार त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल, असा इशारा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी येथे दिला. दरम्यान, गोवा राज्यास विशेष आर्थिक दर्जा तसेच खाणउद्योग बंद झाल्यामुळे त्यावर अवलंबित लोकांना आर्थिक साहाय्य मिळावे म्हणून आर्थिक मदत मागण्यासाठी पर्रिकर हे उद्या (बुधवारी) पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेणार आहेत.
बेकायदा खाण उद्योगांमध्ये अडकलेल्यांविरोधात कारवाई करण्याच्या आपल्या आश्वासनाची पूर्तता करण्यास आपण बांधील आहोत. कायद्याप्रमाणे संबंधितांवर निश्चित कारवाई होईल, कायद्यापेक्षा कोणीही मोठे किंवा वरतीही नाही, असे पर्रिकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. खाणमालकांसमवेत आपली हातमिळवणी झाली असल्याचे चित्र काही प्रसारमाध्यमांनी रंगविले असल्याचाही आरोप पर्रिकर यांनी केला. खाणउद्योग पुन्हा सुरू करण्यासंबंधी सरकार आणि खाणमालकांचे एक सामायिक उद्दिष्ट आहे, परंतु आपण खाणमालकांसमवेत आहोत असा त्याचा अर्थ नव्हे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने खाणउद्योगावर बंदी घातल्यामुळे राज्याची सुमारे २१ टक्के अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. राज्यातील खाणउद्योगात लोहखनिजांचे मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीरपणे उत्खनन करण्यात आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने २१ सप्टेंबर २०१२ रोजी खाणउद्योगावर अंतरिम बंदी घातली. आता या प्रकरणी १० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार असून सरकार चालविणे हे आमचे काम असल्याच्या आमच्या भूमिकेचा आम्ही पुनरुच्चार करू, असे पर्रिकर यांनी सांगितले.
राज्याला विशेष आर्थिक दर्जा आणि खाणउद्योग बंद झाल्यामुळे त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळासमवेत आपण पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहोत, अशी माहिती पर्रिकर यांनी दिली. या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचाही समावेश असेल, असे ते म्हणाले.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे आपल्यासाठी ‘रोल मॉडेल’ असल्याचे पर्रिकर म्हणाले. उद्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्ता मिळाल्यानंतरही अडवाणी यांनी आम्हाला आशीर्वाद आणि मार्गदर्शन द्यावे, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अडवाणी यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून तुम्ही त्यांचे मन वळविणार काय, असा प्रश्न विचारला असता मी एक लहान नेता आहे. दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांना जे काही करायचे आहे, ते त्यांनी केले आहे, असे उत्तर पर्रिकर यांनी दिले.

Story img Loader