Bihar Floor Test Updates : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरलेले असताना इंडिया आघाडीला सोडून पुन्हा एकदा एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या दोन उपमुख्यमंत्र्यांसह नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जात असताना आरजेडीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले. तेजस्वी यादव म्हणाले की, नितीश कुमार यांनी एकूण नऊ वेळा आणि एकाच टर्ममध्ये तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन बिहारच्या इतिहासात आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. नितीश कुमार आज आमच्यापासून वेगळे झाले असले तरी आम्ही त्यांच्यावर नाराज नाही. त्यांच्याबाबात माझ्या मनात आदरच राहिल.
तुमचं मन रमण्यासाठी आम्ही नाच-गाणं करावं का?
तेजस्वी यादव यांनी आपल्या भाषणात नितीश कुमार यांच्या यु-टर्नबद्दल टोकदार भाष्य केलं. २०१७ पासून नितीश कुमार यांनी दोन वेळा भाजपा आणि दोन वेळा आरजेडीला सोडलं. २०२० साली भाजपावर नितीश कुमार यांनी आरोप केला होता की, भाजपा त्यांच्या पक्षाला फोडण्याचा प्रयत्न करत आहे. “आता मी मरण पत्करेन पण पुन्हा भाजपाबरोबर जाणार नाही. मी आता भाजपाला हद्दपार करण्यासाठी आरजेडीशी आघाडी करत आहे”, असं तुम्ही म्हणाला होता. मग पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर कसे गेलात? असा प्रश्न तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला. नितीश कुमार यांना उद्देशून तेजस्वी यादव म्हणाले की, तुम्ही राजभवनात शपथ घेतल्यानंतर माध्यमांना सांगितले की, महाआघाडीत तुमचे मन रमत नाही. मग तुमचे मन रमण्यासाठी आम्ही काय नाच-गाणं करायला हवं होतं का?
अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली? जुन्या सहकाऱ्याने सांगितलं कारण; या मोठ्या नेत्यावर फोडलं खापर
आम्ही आज विरोधात आलो याचे आम्हाला अजिबात दुःख नाही. कारण आम्ही १७ महिन्यांच्या काळात देशात कुठेच झाले नाही, असे काम करून दाखविले. तुम्ही जेव्हा भाजपाला दगा देण्याच्या तयारीत होता, तेव्हा आम्ही तुमच्याबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी तयार नव्हतो. पण देशभरातील विरोधी पक्षातील नेत्यांनी दबाव टाकला. तसेच २०२४ मध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नितीश कुमार यांच्याशी हातमिळवणी करा, असे आम्हाला सुचविण्यात आले. म्हणून आम्ही नितीश कुमार यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं. भाजपा दूर ठेवण्यासाठी आपण सरकार स्थापन केलं ना?, असा खोचक प्रश्न तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला.
नितीश कुमार यांची पलटी आणि मोदी गॅरंटी
आज बिहारमधील कोणत्याही मुलाला विचारा की, नितीश कुमार यांच्यावर विश्वास आहे का? त्यानंतर मुलं असे असे शब्द वापरतात. जे आपण ऐकूही शकत नाही. आज नितीश कुमार पुन्हा भाजपामध्ये गेले आहेत. भाजपाचे लोक मोदीची गॅरंटी असल्याचे वारंवार सांगतात. मग मी भाजपाला आवाहन करतो की, सांगा नितीश कुमार हे परत पलटी मारणार की नाही मारणार? याबद्दल तुमची मोदी गॅरंटी काय सांगते? अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली.