राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यानंतर मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता हे जर सिद्ध झालं तर मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे. भाजपाचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी हा दावा केला होता की तृणमूल काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा देण्यात यावा म्हणून ममता बॅनर्जींनी अमित शाह यांना फोन केला होता. हा दावा खोडून काढत ममता बॅनर्जींनी थेट आव्हान दिलं आहे आणि आपण प्रसंगी राजीनामा द्यायलाही तयार आहोत असं म्हटलं आहे. ११ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस या पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला होता.

सुवेंदु अधिकारी यांनी काय दावा केला होता?

१८ एप्रिलला भाजपा नेते सुवेंदु अधिकारी यांनी हुगळी जिल्ह्यातल्या सिंगूरमध्ये रॅलीमध्ये असं म्हटलं होतं की तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर ममता बॅनर्जींनी गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता. निवडणूक आयोगाने हा निर्णय रद्द करावा अशी विनंती अमित शाह यांना ममता बॅनर्जींनी केली होती असा दावा अधिकारी यांनी केला होता. त्यानंतर पश्चिम बंगालचं राजकारण तापलं होतं. आता ममता बॅनर्जींनी हा दावा खोडला आहे. ममता बॅनर्जींनी थेट यावर मी राजीनामा द्यायला तयार आहे असं म्हणत तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

पुढच्या वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्याच अनुषंगाने ममता बॅनर्जींवर टीका केली आहे. तर ममता बॅनर्जी यांनी त्या टीकेला थेट उत्तर दिलं आहे. तसंच ममता बॅनर्जी असंही म्हणाल्या आहेत की लोकसभा निवडणुकीत भाजपाला २०० च्या पुढे जाता येणार नाही. तसंच आपल्या पक्षाचं नाव यापुढे अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस असं असणार आहे असंही त्यांनी सांगितलं.