पाकिस्तानी प्रेमिका सीमा हैदर तिच्या चार मुलांसह भारतात राहणाऱ्या सचिन मीनासाठी अवैधमार्गे भारतात आली. पाकिस्तान ते भारत व्हाया नेपाळ हा तिचा अवैध प्रवास, दोघांचं कथित लग्न यावरून सध्या सीमा आणि सचिन बरेच चर्चेत आहेत. सीमा पाकिस्तानची गुप्तहेर असू शकते असा संशय व्यक्त केला गेला आहे. त्यादृष्टीने तिची चौकशीही सुरू आहे. परंतु, सीमाचे जसे विरोधक आहेत, तसंच तिचे समर्थकही बरेच आहेत. म्हणूनच तिला एका चित्रपटाची ऑफर मिळाली, जॉब मिळाला आणि आता तर त्याही पुढे जाऊन तिला थेट एका पक्षाने पक्षात येण्याची आणि आगामी २०२४ लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे.
सीमा आणि सचिन यांची लव्हस्टोरी देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. परंतु, असे असताना त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्या दोघांनाही नोकऱ्या नसल्याने घरात अन्नधान्य नसल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर तिला गुजरातमधील एका कंपनीने नोकरीची ऑफर दिले असल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले. नोकरी मिळाल्यानंतर आता तिला एका चित्रपटाची ऑफर आली असून ‘टेलर मर्डर स्टोरी’ या चित्रपटात तिला भारतीय गुप्तहेराची भूमिका मिळाली आहे. आता याही पुढे जाऊन सीमाला चक्क राजकारणात एन्ट्री करण्याची संधी मिळाली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने तिला ही ऑफर दिली आहे.
हेही वाचा >> पाकिस्तानी सीमा हैदर ‘या’ चित्रपटात साकारणार भारतीय रॉ एजंटची भूमिका
रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मासूम किशोर यांनी याबाबत आज तकशी संवाद साधला. ते म्हणाले की, “सीमा हैदर पाकिस्तानची नागरिक आहे आणि ती भारतात आली आहे. आपल्या सुरक्षा यंत्रणांनी तिला क्लीन चिट दिली आणि तिला भारतीय नागरिकत्व मिळाले तर तिचं आम्ही आमच्या पक्षात स्वागत करू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या कायद्यानुसार, प्रत्येक भारतीय नागरिकत्वाला कोठेही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे.”
मासूम किशोर पुढे म्हणाले की, “आतापर्यंत झालेल्या चौकशीत तिच्यावरील कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. जर सुरक्षा यंत्रणांनी तिला क्लीन चिट दिली तर आम्ही तिला आमच्या पक्षात प्रवक्ता बनवू. कारण ती एक उत्तम वक्ता आहे. जर भारताचं नागरिकत्व मिळालं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या चिन्हावर आगामी निवडणुकीतही तिला संधी देऊ. २०२४ ची लोकसभा निवडणूकही ती लढवू शकते. फक्त तिला भारतीय नागरिकत्व मिळणं गरजेचं आहे.”