केंद्र सरकारने थकवलेला निधी दिला नसल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांसाठी उपोषणाला बसल्या आहेत. तेव्हा संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॅनर्जींनी लक्ष्य केलं. पंतप्रधानांनी निवडणुकीवेळी ‘दीदी ओ दीदी’ म्हणत ममता बॅनर्जींची खिल्ली उडवली होती. त्याला पलटवार करताना ममता बॅनर्जींनी पंतप्रधानांचा उल्लेख ‘नंदलाल ओ नंदलाल’ असा केला आहे.
केंद्र सरकारवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसण्याचा इशारा ममता बॅनर्जींनी दिला. तसेच, “माझ्या उपोषणाने लोकांना त्रास होण्याचं कारण काय?,” असा सवालही ममता बॅनर्जींनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : अमृतपाल सिंगचा नवीन व्हिडीओ आला समोर, पोलिसांना आव्हान देत म्हणाला…
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मी वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे. केंद्रात अनेकवेळा मंत्री राहिली आहे. आता भाजपावाले मला संविधान शिकवणार का? मी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याविरोधात उपोषणाला बसले होते. मी एक मुख्यमंत्री आहे. बंगालमध्ये माझा पक्ष सत्तेत असल्याने केंद्राने जनतेचा निधी बंद करून टाकला आहे. गरज पडल्यास पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणास बसेल.”
“भाजपा गुंडांचा पक्ष”
“भाजपा हा गुंडांचा पक्ष आहे. एक नेता सांगत आहे की, ते रामनवमीच्या रॅलीत हत्यार घेऊन चालणार. मी रामनवमीच्या रॅली थांबवणार नाही. पण, जर कोणत्याही मुस्लिमाच्या घरावर हल्ला झाला, तर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.
हेही वाचा : कर्नाटकात भाजपाला मोठा झटका बसण्याची शक्यता, सर्वेत धक्कादायक आकडेवारी समोर
“तृणमूल काँग्रेस कमकुवत नाही”
“तृणमूल काँग्रेस कमकुवत नाही. ते म्हणत आहेत, ईडीच्या अधिकाऱ्यांची एक टीम पाठवणार. एवढी ताकद? कोणत्या तपास यंत्रणेच्या माध्यमातून नोकरी मिळाली, याची कागदपत्र आम्ही समोर आणू,” असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.