पठाणकोटवरील हल्ल्याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचा इशारा
दहशतवादी हल्ले करून आपल्याला वेदना देणाऱ्या देशाला तशाच वेदना दिल्या पाहिजेत. जशास तसे प्रत्युत्तर दिले नाही तर अशा घटना थांबणार नाहीत. हे प्रत्युत्तर केव्हा, कसे व कोठे द्यायचे हे आता भारत ठरवील, असा इशारा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी दिला. लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांच्यासह अनेक लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात पर्रिकर यांनी हे वक्तव्य केले.
पठाणकोटच्या हवाई तळावरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांचा आम्हाला अभिमानच आहे. त्याचबरोबर त्यांच्या बलिदानाचे आम्हाला दु:खही आहे. हल्ला झाला तर काही सैनिकांना प्राण गमवावे लागणारच, युद्धात सैनिक हुतात्मा होऊ शकतात हे खरे. पण तरी या हल्ल्यात एक सैनिक प्रत्यक्ष चकमकीत हुतात्मा झाला. स्वत:चा जीव देण्यापेक्षा देशाच्या शत्रूंचा प्राण घ्या, असेच आपण सैनिकांना सांगितले पाहिजे. आपल्या शत्रूला नेस्तनाबूत केले पाहिजे, असे पर्रिकर म्हणाले. कुणी येऊन तुम्हाला मारले तर शांत बसायचे असे कुठे धोरण असू शकते का, असा सवालही त्यांनी या वेळी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा