भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले बॅनस काढल्यामुळे बसप नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती सत्ताधारी समाजवादी पक्षावर चांगल्याच संतापल्या आहेत. राजकीय  सूडभावनेने वागणाऱ्या समाजवादी पक्षाला पुन्हा सत्तेत आल्यावर चांगलाच धडा शिकवीन, असे संतप्त उद्गार त्यांनी  काढले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन स्थळाजवळ लावलेले फलक लावण्यात आले होते. मात्र प्रशासनाने ते काढून टाकले. सप सरकारची मानसिकता लक्षात घेऊन आमच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रशासनाकडून फलक लावण्याबद्दल परवानगी मागितली होती. त्यानुसार शनिवापर्यंत सर्वत्र जयंतीनिमित्त फलक लावण्यात आले होते. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक परिवर्तन स्थळाजवळ गर्दी करणार हे लक्षात घेऊन सप सरकारने रातोरात ते फलक हटवले.
सप सरकार बसपला आपला एक क्रमांकाचा शत्रू मानत आहे. त्यामुळे ते सूडबुद्धीचे राजकारण करीत आहेत. त्यामुळे बसप सत्तेत आल्यावर सूडबुद्धीचे राजकारण करणाऱ्या समाजवादी पक्षाला चांगलाच धडा शिकवीन, असा इशारा मायावती यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिला.