Vladimir Putin On Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये दोन वर्षांपेक्षा जास्त काळ संघर्ष सुरु आहे. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे. या युद्धात युक्रेनची शहरे उद्ध्वस्त होत आहेत. या युद्धाचे परिणाम जगभरात देखील पाहायला मिळत आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला युक्रेन-रशियातील संघर्ष तात्पुरता थांबण्याची शक्यता आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी सफल होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने कीवला लष्करी मदत आणि गुप्तचर माहिती देण्यावरील बंदी उठवल्याची घोषणा केल्यानंतर युक्रेनने तत्काळ युद्धबंदी लागू करण्यास तयारी दर्शवली आहे.

तसेच या संदर्भात सौदी अरेबियामध्ये अमेरिका आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय चर्चाही झाल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान, व्हाईट हाऊस आणि कीव यांच्या संयुक्त निवेदनानुसार, युद्धबंदी प्रस्तावात तात्पुरती युद्धबंदीची तरतूद आहे. जी दोन्ही बाजूंनी मान्य केल्यास वाढवता येऊ शकते. युक्रेनने या योजनेशी आपली वचनबद्धता दर्शविल्यानंतर आता यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनबरोबर सुरू असलेले युद्ध थांबवण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाशी आम्ही सहमत असल्याचं म्हटलं आहे. मात्र, त्यांनी एक अट ठेवली आहे. व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं की, “रशिया लढाई थांबवण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाशी सहमत आहोत. पण कोणत्याही युद्धबंदीमुळे कायमस्वरूपी शांतता निर्माण झाली पाहिजे आणि संघर्षाची मूळ कारणे दूर झाली पाहिजेत. शत्रुत्व थांबवण्यासाठी युद्धबंदीच्या प्रस्तावाशी आम्ही सहमत आहोत. पण युद्धबंदीमुळे शांतता निर्माण झाली पाहिजे. तसेच या संकटाची मूळ कारणे दूर झाली पाहिजेत, या वस्तुस्थितीवरून आम्ही पुढे जात आहोत”, असं पुतिन यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, व्यावहारिक दृष्टीने युद्धबंदीचा अर्थ काय असेल? यावरही पुतिन यांनी प्रश्न उपस्थित केले. ज्यामुळे रशियन हद्दीत युक्रेनियन घुसखोरी आणि २००० किलोमीटरच्या रेषेवरील व्यापक परिणामांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. याबाबत व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं की, “याचा अर्थ असा होईल का की तिथले सगळे लोक निघून जातील? त्यांनी तेथील नागरिकांविरुद्ध असंख्य गुन्हे केल्यानंतर आपण त्यांना सोडावे का? की युक्रेनियन नेतृत्व त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगेल?”.

याबरोबरच व्लादिमीर पुतिन यांनी असंही म्हटलं की, “युक्रेनला सक्तीने सैन्य जमा करणे, युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू ठेवता येईल का? नवीन सैन्य जमा झालेल्या तुकड्यांना प्रशिक्षित करता येईल का? की ते केले जाणार नाही?,” असे अनेक प्रश्न व्लादिमीर पुतिन यांनी यावेळी उपस्थित केले. तसेच अमेरिकन अधिकाऱ्यांशी वाटाघाटी करण्याचा आणि शक्यतो राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा त्यांनी सल्ला दिला.

या अटींबाबत पुतिन यांनी म्हटलं की, “कोणत्याही युद्धबंदीमध्ये युक्रेनच्या अधिक सैन्य तैनात करण्याच्या किंवा शस्त्रास्त्रे आयात करण्याच्या क्षमतेवर निर्बंध असले पाहिजेत. अशा मर्यादा लागू केल्यास युद्धबंदीनंतर पुन्हा लढाई सुरू झाल्यास कीवला तोटा होईल.” दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्या वक्तव्यावर त्वरित टीका केली आणि इशारा दिला की त्या इतक्या अटी आहेत की युद्धबंदी साध्य करणे अशक्य होऊ शकते. झेलेन्स्की यांनी म्हटलं की, “रशियन राष्ट्राध्यक्षांनी इतक्या पूर्वअटी घातल्या आहेत की काहीही होणार नाही, किंवा ते शक्य तितकं लांबणीवर टाकलं जाईल,” असं झेलेन्स्की यांनी म्हटलं.

Story img Loader