गाझामध्ये हमास आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशातच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी लेबनॉनचे इराण समर्थक हिज्बुलाह गटाला मोठी धमकी दिली आहे. नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे हिज्बुल्लाहने इस्रायलसह तिसऱ्या लेबनॉन युद्धाची सुरुवात करु नये नाहीतर आम्ही लेबनॉनची राजधानी बेरुतची अवस्था गाझा सारखी करु. नेत्यानाहू यांनी ही खुली धमकी दिली आहे. त्यांचं हे वक्तव्य अशा वेळी समोर आलं आहे ज्यावेळी हिज्बुल्लाहने एक गाईडेट मिसाईल हल्ला केला होता. या हल्ल्यात ६० वर्षांच्या इस्रायली नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर हिज्बुलाहचे समर्थक हमासला पाठिंबा देत हल्ले करत आहेत. अशावेळी त्यांना नेत्यानाहू यांनी थेट खुली धमकीच दिली आहे.
काय म्हटलं आहे नेत्यानाहू यांनी?
“जर हिज्बुलाहने युद्ध सुरु करण्याचा निर्णय घेतला असेल तर आम्हीही बेरुतची अवस्था गाझा आणि खान यूनिससारखी करु हे त्यांनी लक्षात ठेवावं. तसंच हल्ले सुरुच ठेवले तर ती वेळ लवकरच येईल हे विसरु नका. आम्ही जिंकण्यासाठी कटिबद्ध आहोत. इस्रायली सैन्याच्या मदतीने आम्ही हे युद्ध जिंकू.” अशी थेट धमकीच नेत्यानाहू यांनी दिली आहे. नेत्यानाहू हे लष्कराच्या मुख्यालयात पोहचले होते. त्यांच्यासह इस्रायलचे संरक्षण मंक्षी योव गॅलंट आणि लष्करप्रमुखही होते. नेत्यानाहू यांनी लष्करी सैनिकांची भेट घेतली आणि त्यांचा उत्साह वाढवला. इस्रायली लष्कर उत्तम कामगिरी करत असल्याचंही नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे.
हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने त्यांचा उत्तरी सीमाभाग रिकामा केला होता. हिज्बुल्लाहचे मनसुबे यशस्वी होऊ नयेत म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं होतं. दुसरीकडे पॅलेस्टाईनच्या आरोग्य विभागाने रविवारी ही माहिती दिली आहे की इस्रायल आणि हमासच्या युद्धात गाझामध्ये आत्तापर्यंत १८७३ मुलांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या पोलिसांनी असं म्हटलं आहे की ७ ऑक्टोबरच्या आधी जे नागरिक मारले गेले त्यातल्या ७६९ मृतदेहांची ओळख पटली आहे. इस्रायल आणि हमास युद्ध चालू असताना आत्तापर्यंत गाझामध्ये २९ कर्मचारी मारले गेले आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
दुसरीकडे इस्रायल सरकारने नागरिकांना मदत मिळावी म्हणून त्यात वेग यावा या दृष्टीने केरेम शालोम सीमा भाग खुला करण्यास संमती दिली आहे. ७ ऑक्टोबरला युद्ध सुरु होण्याआधी गाझा या ठिकाणी जाणारे ६० टक्क्यांहून अधिक ट्रक हे केरेम शालोम क्रॉसिंगचा उपयग करत होते.