Independence Day 2023: Har Ghar Tiranga Campaign: भारतीयांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्याकरता आणि भारतीय झेंड्याबद्दल वेगवगेळ्या गोष्टी अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून केंद्र सरकारकडून हर घर तिरंगा मोहीम राबण्यात येत आहे. यंदाही भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच त्यांच्या ट्विटर खात्यावरून एक ट्वीट केले आहे. “हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत प्रत्येकाने आपल्या सोशल मीडिया खात्याचे डिपी बदलून भारताचा तिरंगा ठेवावा. सरकारच्या या अनोख्या प्रयत्नाला पाठिंबा देऊया, जेणेकरून देश आणि आपल्यातील बंध अधिक घट्ट होतील”, असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गेल्यावर्षीही अशाप्रकारचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत डीपीला तिरंगा झळकावला होता. यंदाही अशाचप्रकारचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आले आहे. तसंच, त्यांनीही स्वतःच्या अधिकृत खात्याच्या डिपीला तिरंगा लावला आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला तुम्ही प्रतिसाद देणार का? हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता.
काय आहे हर घर तिरंगा मोहीम?
स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारने गेल्यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची घोषणा केली. हर घर तिरंगा अभियान हा स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा एक भाग आहे. गेल्यावर्षी २२ जुलै २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अभियान सुरू केले होते. या अभियानांतर्गत पंतप्रधान मोदींनी लोकांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले होते. नागरिकांना स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी घराच्या छतावर राष्ट्रध्वज फडकावण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. ज्यांनी त्यांच्या छतावर राष्ट्रध्वज फडकवला आहे ते त्याचे प्रमाणपत्र देखील डाउनलोड करू शकतात. त्याच वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना सोशल नेटवर्किंग साइट्सवरील प्रोफाइल पिक्चर बदलण्याची देखील सूचना केली. हीच मोहिम यंदाही राबवण्यात येत असून प्रत्येकाने आपल्या सोशल मीडिया खात्यावरील प्रोफाईल फोटोला तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.