करोनाची सर्वात पहिली लस घेणाऱ्यांपैकी असणाऱ्या विल्यम शेक्सपिअर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ८१ वर्षांच्या शेक्सपिअर यांना ८ डिसेंबर रोजी फायझर-बायोएनटेकच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी हॉस्पीटल कॉनव्हेंट्रीमध्ये मार्गारेट केनान या ९० वर्षीय आजींबरोबरच शेक्सपिअर यांनाही लसीचा डोस देण्यात आलेला. क्लिनिकल ट्रायलदरम्यान या दोघांनाही लसीचे डोस देण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लस घेतल्यानंतर विल्यम शेक्सपिअर यांच्या नावाची वृत्तपत्रांमध्ये बरीच चर्चा झाली होती. जगातील सर्वोत्तम नाटककार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विल्यम शेक्सपिअरच्या नावाशी साधर्म्य असणारं नाव असल्याने या ८१ वर्षीय आजोबांबद्दल इंग्लंडमध्ये चांगलीच चर्चा रंगल्याचं दिसून आलं. गेल्या चारशे वर्षांहून अधिक काळ नाटकं जगभरातील रंगकर्मीनाच नव्हे, तर एकूणच कलावंत जमातीला कायम खुणावत आलेल्या शेक्सपिअर या नावाशी तंतोतंत मेळ खाणारं नाव असल्याने या आजोबांना लस दिल्याच्या बातमीची दखल आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनाही घेतली होती.

ज्या युनिव्हर्सिटी हॉस्पीटल कॉनव्हेंट्रीमध्ये शेक्सपिअर यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी करोनाची लस घेतली त्याच रुग्णालयामध्ये त्यांचा मृत्यू झाला. शेक्सपिअर हे रोल्स रॉयस कंपनीचे माजी कर्मचारी होते. त्यांच्या मृत्यूसंदर्भातील बातमी डेली मेल या वृत्तपत्राने दिलीय. जेनी इनिस या शेक्सपिअरच्या मित्राने फेसबुकवर “अनेक गोष्टींसाठी तो कायम आठवणीत राहील. त्यामध्ये लस घेण्याचाही समावेश आहे. त्याला श्रद्धांजली वाहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वत:चं लसीकरण करुन घेणं,” असा मजकूर पोस्ट केलाय.  शेक्सपिअर यांचा मृत्यू करोनामुळे झाला नसून आधीपासून असणाऱ्या आजारामुळे झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

डिसेंबरमध्ये लस घेतल्यानंतर शेक्सपिअर यांनी आपली प्रतिक्रिया देताना, त्यांनी समाधान व्यक्त करतानाच रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळाल्याचं सांगितलं. “करोनाची पहिली लस घेणारी व्यक्ती म्हणून त्यांची प्रसारमाध्यमांनी दखळ घेतली. त्यांनी मागील अनेक दशकांमध्ये केलेल्या कामासाठी ते कायम लक्षात राहतील,” असं शेक्सपिअर सदस्य असणाऱ्या वेस्ट मिडलॅण्ड्स लेबर ग्रुपने ट्विटरवरुन म्हटलं आहे.

शेक्सपिअर यांच्या मागे पत्नी, दोन मुलं आणि नातवंड असा परिवार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: William shakespeare first man in world to receive covid 19 jab dies aged 81 in england scsg