वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी मलाला युसूफजाई जगाच्या नजरेत आली. मुलींना शिकता यावे या उद्देशाने पछाडलेल्या मलालावर तालिबानी अतिरेक्यांनी कट्टर इस्लामी वातावरण. अशा ठिकाणी मुलींनी शिकण्याची कल्पनाही धर्मबाह्य़ मानली जाणारी. तिथे ही एवढीशी चिमुरडी मुलींनी शिकावे म्हणून प्रयत्न करीत होती. बीबीसीच्या उर्दू भाषेतील प्रसारणासाठी ब्लॉग लिहीत होती. पहिल्यांदा पोरवय म्हणून मोठय़ांनी दुर्लक्ष केले. परंतु सांगूनही ती ऐकेना तेव्हा दटावणी, धमकावणी आदी प्रकार सुरू झाले. तरीही ऐकेना तेव्हा मात्र थेट तिला संपवण्याचाच प्रयत्न झाला. तिच्या डोक्यात गोळी लागली. ती वाचली हे आश्चर्यच होते. अनेक महिने ब्रिटनमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले. जगाने तिला डोक्यावर घेतले, तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या. परंतु स्वात व्हॅलीमध्ये मात्र तिला सहानुभूती तर दूरच; उलट अवहेलना आणि तिरस्कारच पदरी पडला. तिच्याकडे घरची मंडळी संशयाने बघू लागली. तिला जणू वाळीतच टाकले गेले. पाश्चात्त्य राष्ट्रांचा हा कुटिल कावा असल्याचा समज करून घेतला गेला.
संयुक्त राष्ट्रांमध्ये शेकडो प्रतिनिधींसमोर मलालाने केलेले आत्मविश्वासपूर्ण भाषण आजही अनेकांच्या पक्के स्मरणात आहे. अतिरेक्यांना वाटले आपण हिचे उद्दिष्ट आणि महत्त्वाकांक्षा संपवून टाकू. प्रत्यक्षात अतिरेक्यांच्या हल्ल्यामुळे आमच्यातील भीती, अगतिकता आणि दुर्बलता संपली आणि शक्ती व धैर्याचा जन्म झाला, असे वास्तववादी विचार मलालाने मांडले तेव्हा सगळ्यांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात तिला मानवंदना दिली.
इतकी खंबीर आणि कणखर मलाला जीवघेण्या हल्ल्यानंतरही अगदी तालिबान्यांचाही द्वेष मात्र करीत नाही. मला ज्याने गोळी घातली तो माझ्यापुढे आला आणि माझ्या हातात बंदूक असली तरीसुद्धा मी त्याच्यावर गोळी चालवणार नाही, या तिच्या उद्गारांनी तर अवघे जगच जिंकून घेतले होते.
दुसरीकडे मलालाला आपल्या घरी, गावी परतणे आता मुश्कील होऊन बसले आहे. ती आणि तिचे कुटुंबीय आता ब्रिटनमध्येच स्थायिक झाले आहेत. ती परत गेली तर अतिरेकी तिला आणि कुटुंबीयांनाही मारून टाकतील हे नक्की आहे. तालिबान्यांचा सध्याचा प्रमुख मुल्ला फजलुल्ला यानेच २०१२ मध्ये तिला मारून टाकण्याची आज्ञा दिली होती. तो अजूनही तिच्यावर लक्ष ठेवून आहे. या सगळ्या परस्परविरोधी वातावरणात मलालाला ठाम आधार आहे तो वडिलांचा. किंबहुना त्यांच्यामुळेच ती एवढे धाडस करू शकली आहे.
शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळवून मलालानेही एक इतिहास रचला आहे. नोबेल पुरस्कार मिळविणारी सगळ्यात लहान मानकरी म्हणून १७ वर्षांच्या मलालाची इतिहासात नोंद झाली आहे. याआधी १०० वर्षांपूर्वी, १९१५ मध्ये ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या ब्रिटिश वंशाच्या लॉरेन्स ब्रॅग याला २५व्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला होता. तो आणि त्याचे वडील यांना विज्ञान विभागात विभागून तो पुरस्कार मिळाला होता. मलाला हिलाही शांततेचा नोबेल पुरस्कार विभागून मिळाला आहे. पण ती अजूनही आहे अवघी १७ वर्षांची चिमुरडी!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा