Winter Session Of Parliament 2024: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा व्यक्त केली की, या अधिवेशनात फलदायी आणि रचनात्मक चर्चा होईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका करत, ते संसद विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “विरोधक संसद विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कृतींवर जनतेचे बारीक लक्ष आहे. वेळ आल्यावर त्यांना जनता जबाबदार धरेल. २०२४ चा हा शेवटचा काळ आहे, देशही २०२५ चे स्वागत जोशात आणि उत्साहात करण्याच्या तयारीत आहे. संसदेचे हे अधिवेशन अनेक अर्थाने विशेष आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या राज्यघटनेचा ७५ व्या वर्षात प्रवेश होणे ही लोकशाहीसाठी अतिशय उज्ज्वल बाब आहे.”
“मूठभर लोकांकडून संसद नियंत्रित करण्याचा प्रयत्न”
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सकारात्मक चर्चा घडावी यासाठी आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, “दुर्दैवाने आपल्या राजकीय फायद्यासाठी काही लोक, ज्यांना जनतेने नाकारले आहे, ते संसदेवरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. संसदेचे कामकाज थांबवून त्यांचे स्वतःचे उद्दिष्ट साध्य होत नाही. पण, त्यांची अशी कृती पाहून जनता त्यांना नाकारते. जनतेने या लोकांना ८०-९० वेळा नाकारले आहे.”
नवे खासदार नव्या कल्पनाच नव्हे तर ऊर्जाही घेऊन येतात आणि ते कोणा एका पक्षाचे नसून सर्वच पक्षांचे असतात. पण, काही लोक त्यांचे हक्क दडपतात, ही सगळ्यात क्लेशदायक गोष्ट आहे. त्यांना सभागृहात बोलण्याची संधीही मिळत नाही. लोकशाही परंपरेत येणाऱ्या नव्या पिढ्यांना तयार करणे हे प्रत्येक पिढीचे काम असते, पण ज्यांना जनतेने ८०-८०, ९०-९० वेळा नाकारले ते ना संसदेत चर्चा होऊ देतात, ना लोकशाहीच्या भावनेचा आदर करतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
१६ विधेयके सूचीबद्ध
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. या अधिवेशनात सरकारने वक्फ (दुरुस्ती) विधेयकासह १६ विधेयके सूचीबद्ध केली आहेत. सध्या लोकसभेत आठ आणि राज्यसभेत दोन विधेयके प्रलंबित आहेत. संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकार अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. त्यामुळे काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर आक्षेप घेऊ शकतात. अशा स्थितीत संसदेच्या हिवाळी अधिवेशन गदारोळ होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा: अदानी’आरोपांच्या छायेत आजपासून संसद अधिवेशन; सर्वपक्षीय बैठकीत विरोधक आक्रमक
विरोधकांकडून अदाणी लक्ष्य
हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत विरोधी पक्षांनी, पहिल्याच दिवशी अदानी यांच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी मागणी केली होती. दुसरीकडे सरकारने कामकाज सुरळीत चालू देण्याचे आवाहन केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काँग्रेसचे गौरव गोगोई आणि आपचे संजय सिंह यांनी अदाणी समूहावरील आरोप आणि भ्रष्टाचारप्रकरणी अमेरिकेत दाखल झालेला खटला अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे.