करोना संक्रमण काळामुळे गेली दीड वर्ष संसदीय अधिवेशन हे निर्धारीत पुर्ण वेळ घेता आले नव्हते. गेल्या वर्षाचे हिवाळी अधिवेशन करोनोच्या लाटेमुळे घेताच आले नव्हते. तर त्यानंतर होणारी अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अधिवेशने ही कमी कालावधीची ठरली होती. असं असतांना आता संसदेच्या कामकाज सल्लागार समितीने हिवाळी अधिवेशनाचे वेळापत्रक हे जाहीर केलं आहे.
२९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. २० दिवसांचे प्रत्यक्ष कामकाज या कालावधीत होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज हे एकाच वेळी करोना संदर्भातल्या प्रोटोकॉलचे पालन करत होणार आहे.
याआधीचे म्हणजे पावसाळी अधिवेशन हे पेगॅसस प्रकरणावरुन गाजले होते. शेतकरी कायदा हा मुद्दाही पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी चांगला लावून धरला होता. तेव्हा गेल्या काही महिन्यातील विविध घडामोडी लक्षात घेता होऊ घातलेले संसदेचे हिवाळी अधिवेशन हे वादळी ठरणार यात शंका नाही.