भाजपने पंतप्रधानपदासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केल्याने त्यांचे कट्टर विरोधक बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. या घडामोडी पाहता आमची तीन महिन्यांपूर्वीची भाजपशी काडीमोड घेण्याची भूमिका योग्य असल्याचा दावा त्यांनी केला.
मोदींची निवड म्हणजे भाजपची विनाशकाले विपरीत बुद्धी अशा शब्दांत त्यांनी बोल सुनावले. मोदींसारख्या विभाजनवादी नेत्याला देश कधीही स्वीकारणार नाही असा दावा त्यांनी केला. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या विरोधात एकजूट होण्याची ही वेळ असताना भाजपने वेगळा मार्ग अवलंबल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नवे मित्र जोडण्याऐवजी भाजपने जनता दलासारखा विश्वासू मित्र गमावल्याचे बोल भाजपला सुनावले. भाजपमध्ये ज्येष्ठांचा सन्मान नाही असे लालकृष्ण अडवाणींचा नामोल्लेख न करता त्यांनी सांगितले. मोदींच्या निवडीचा जल्लोष करून भाजप वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सामान्य नागरिक त्यांना साथ देणार नाहीत असा दावा नितीशकुमार यांनी केला.

Story img Loader