देशात गेल्या २४ तासांत करोनामुळे ४१२० जण मृत्युमुखी पडल्यामुळे देशातील करोनामृत्यूंचा आकडा २,५८,३१७ वर पोहोचला आहे. याच कालावधीत आणखी ३,६२,७२७ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या २,३७,०३,६६५ झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केलं आहे. भारतीयांसाठी चिंताजनक बाब म्हणजे मागील २४ तासांमध्ये करोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा करोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. नव्याने करोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही करोनामुक्त झालेल्यांपेक्षा १० हजारांनी अधिक आहे.
भारतामधील एकूण रुग्णसंख्या दोन कोटी ३७ लाखांहून अधिक झाली आहे. तर करोनावर मात करणाऱ्यांची संख्या एक कोटी ९७ लाख ३४ हजार ८२३ इतकी असल्याचं आरोग्यमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. देशातील सक्रीय करोना रुग्णांची संख्या ३७ लाख १० हजार ५२५ इतकी आहे. देशामध्ये एकूण १७ कोटी ७२ लाख १४ हजार २५६ जणांचं लसीकरण करण्यात आल्याचंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
India reports 3,62,727 new #COVID19 cases, 3,52,181 discharges and 4,120 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 2,37,03,665
Total discharges: 1,97,34,823
Death toll: 2,58,317
Active cases: 37,10,525Total vaccination: 17,72,14,256 pic.twitter.com/2hCw318J4T
— ANI (@ANI) May 13, 2021
मंगळवारी देशामधील करोना मृतांच्या संख्येने उच्चांक गाठला होता. ४२०५ जणांचा मंगळवारी करोनामुळे मृत्यू झाल्याचं बुधवारी सरकारने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं होतं. देशातील करोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन १२ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना बुधवारी एक पत्र पाठवलं. करोना प्रतिबंधासाठी मोफत सामूहिक लसीकरण सुरू करावे, तसेच सेंट्रल व्हिस्टा सुधार प्रकल्प स्थगित करून तो पैसा महासाथीविरुद्धच्या लढ्यात वापरावा, असे आवाहन या पत्राच्या माध्यमातून १२ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलं आहे. गरजूंना अन्नधान्य पुरवावे, तसेच बेरोजगारांना दरमहा ६ हजार रुपये द्यावे, अशीही मागणी काही मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या संयुक्त पत्रात केली आहे. तीन केंद्रीय शेतीविषयक कायदे रद्द केल्यास लाखो अन्नदाते महासाथीचे बळी होण्यापासून वाचतील असे सांगून, हे कायदे रद्द करण्याची मागणीही या नेत्यांनी केली आहे.