उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत दणकून मार खाल्ल्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव हवालदिल झाले आहेत. पक्षाच्या पराभवाचे खापर ते मुलगा अखिलेशच्या कारभारावर फोडण्याच्या तयारीत आहेत. याच उद्विग्नतेतून त्यांनी आता मी संसदेत कोणासोबत बसू, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मुलायमसिंग म्हणाले, जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी २००४च्या निवडणुकीत आम्ही ३६ जागा जिंकल्या होत्या. यावेळी (अखिलेशकडे बोट दाखवत) हा मुख्यमंत्री आहे आणि आम्हाला पाचच जागा मिळाल्या आहेत. असे का? मला या पराभवाची राजधानीमध्ये उत्तरे देताना अवघड जाणार आहेत.
मुलायमसिंग यांनी यावेळी इतर राज्यातील नेत्यांचाही दाखला दिला. ते म्हणाले, तमिळनाडूमध्ये जयललिता जिंकल्या. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, ओडिशामध्ये नवीन पटनाईक आणि पंजाबमध्ये प्रकाशसिंग बादलही जिंकले. या सर्वांनी त्यांच्या राज्यांमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या. असे असताना उत्तर प्रदेशात आपला पराभव का झाला, हे मला कोणी सांगेल का, असा प्रश्न त्यांनी मांडला आहे.
उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव आणि त्यांचे नातेवाईक उभे असलेल्या पाचच जागांवर समाजवादी पक्षाला यश मिळवता आले आहे. इतर सर्व ठिकाणी या पक्षाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. पक्षाने सर्व पराभूत उमेदवारांना पराभवाची कारणे लेखी स्वरुपात देण्यास सांगितले आहे.