कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि भाजपाने उमेदवारी घोषित केलेल्या अभिजीत गंगोपाध्याय यांनी नुकतेच महात्मा गांधी आणि नुथराम गोडसे यांच्याबाबत केलेल्या एका विधानावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून त्यांची लोकसभेची उमेदवारी परत घ्यावी, अशी मागणी भाजपाकडे केली आहे. गंगोपाध्याय यांनी स्थानिक बंगाली वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले, “मी महात्मा गांधी आणि गोडसे यांच्यापैकी एकाची निवड करू शकत नाही. गोडसे यांनी हत्या करण्याचा निर्णय का घेतला? त्या कारणांच्या मुळाशी जायला हवं.” माजी न्यायाधीशंच्या या विधानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
अभिजीत गंगोपाध्याय म्हणाले, “मी विधी क्षेत्रातून आलो आहे. प्रत्येक प्रकरणाची दुसरी बाजू असते, ती जाणून घेणे मला महत्त्वाचे वाटते. नथूराम गोडसे यांचे साहित्य वाचून त्यांनी महात्मा गाधींची हत्या करण्याचा निर्णय का घेतला? हे जाणून घेण्याची मला गरज वाटते. तोपर्यंत मी गांधी आणि गोडसे यांच्यापैकी कुणा एकाची निवड करणार नाही.”
अभिजीत गंगोपाध्याय यांच्या विधानावर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्स अकाऊंटवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, उच्च न्यायालयाचा माजी न्यायाधीश, ज्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. ज्यांना पंतप्रधानांचा थेट आशीर्वाद असून जे भाजपाचे उमेदवार आहेत. अशा व्यक्तीने गांधी किंवा गोडसे यांच्यापैकी एकाची निवड करू शकत नाही, असे म्हणणे संतापजनक आहे.
गंगोपाध्याय यांचे विधान पूर्णपणे अस्वीकार्य असून त्यांनी महात्मा गांधी यांचा वारसा जपण्यासाठी कोणताही प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी तात्काळ मागे घ्यावी, असे आवाहन जयराम रमेश यांनी केले. राष्ट्रपित्यांच्या संरक्षणासाठी आजचे राष्ट्रप्रमुख कोणता निर्णय घेतील? असाही प्रश्न जयराम रमेश यांनी उपस्थित केला.
‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ हे नारे रचणारे मुस्लीम होते; केरळच्या मुख्यमंत्र्यांचा दावा
अभिजीत गंगोपाध्याय यांनी काही दिवसांपूर्वीच न्यायाधीशपदाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. भाजपाने रविवारी पश्चिम बंगालमधील १९ उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये अभिजीत गंगोपाध्याय यांच्याही नावाचा समावेश होता. दरम्यान बंगाली वृत्तवाहिनीशी बोलताना गंगोपाध्याय यांनी महात्मा गांधींच्या हत्येचा निषेधही केला. मात्र ऐतिहासिक घटनांचे सर्व पैलू तपासण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.