देशाच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेची जोरदार तयारी सुरु आहे. या मोहिमेसाठी तीन भारतीयांची निवड करण्यात येणार असून श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपकाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या १६ मिनिटात तिन्ही अवकाशवीर अंतराळात पोहोचतील. अंतराळातील लो अर्थ ऑरबिटमध्ये ते पाच ते सात दिवस राहतील. त्यानंतर त्यांना गुजरात किनारपट्टीजवळच्या अरबी समुद्रात उतरवण्यात येईल. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
२०२२ पर्यंत भारताची ही महत्वकांक्षी ‘गगनयान’ मोहिम प्रत्यक्षात आणण्याचे लक्ष्य इस्त्रोने समोर ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या मोहिमेची घोषणा केली होती. के. सिवन यांनी नवी दिल्लीत या संपूर्ण मोहिमेचे सविस्तर सादरीकरण केले. यावेळी अणू ऊर्जा आणि अवकाश खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह त्यांच्यासोबत होते. एका क्रू मॉडयूलमधून तीन भारतीयांना अवकाशात पाठवले जाईल. हे क्रू मॉडयूल सर्व्हीस मॉडयूलला जोडले जाईल. ही दोन्ही मॉडयूल जीएसएलव्ही एमके ३ या रॉकेटद्वारे अंतराळात पाठवली जातील.
तिन्ही अवकाशवीर आठवडाभर अंतराळात मायक्रो ग्रॅव्हीटी आणि अन्य वैज्ञानिक चाचण्या करतील. या अंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर आणताना ऑरबिटल मॉडयुल स्वत: आपली दिशा बदलेल. १२० किलोमीटर उंचीवर असताना क्रू आणि सर्व्हीस मॉडयूल वेगळे होतील. क्रू मॉडयूल अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीच्या दिशेने येत असताना ब्रेकिंग सिस्टिम अॅक्टीव्ह होऊन वेग कमी होईल. त्यानंतर अंतराळवीर अरबी समुद्रात उतरताना पॅराशूट उघडले जातील. परतीचा प्रवास ३६ मिनिटांचा असेल. काही तांत्रिक समस्या उदभवल्यास बंगालच्या खाडीत मॉडयूल उतरवले जातील असे सिवन यांनी सांगितले. भारताने २००४ पासूनच या मोहिमेची तयारी सुरु केली आहे. या मोहिमेमुळे १५ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.
देशाला दिलेला शब्द पूर्ण करण्यास कटिबद्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ७२ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना ‘मिशन गगनयान’ची महत्वपूर्ण घोषणा केली. मोदींच्या या घोषणेला भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने सकारात्मक प्रतिसाद दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला जो शब्द दिलाय तो पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. २०२२ पर्यंत भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्यासाठी अवकाश संस्था पूर्णपणे सक्षम आहे असे इस्त्रोचे अध्यक्ष आणि वैज्ञानिक के.शिवन यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला २०२२ पर्यंतचे लक्ष्य दिले आहे. ठरवून दिलेल्या वेळेत लक्ष्य पूर्ण करणे आमचे कर्तव्य आहे.