‘यूपीच्या कार्यकाळादरम्यान आमच्या पक्षाचे एक खासदार सोनिया गांधींना भेटले होते. या भेटीत मला अडकवण्याची चर्चा झाली होती. काँग्रेस सरकारला त्यांनी पत्रही लिहिले होते, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना त्यांनी हा दावा केला.
अरुण जेटली यांनी खासदाराचे नाव घेतले नसले तरी, त्यांचा इशारा भाजप खासदार किर्ती आझाद यांच्याकडे आहे. किर्ती आझाद यांनी वेळोवेळी दिल्ली क्रिकेट संघटनेतील कारभारावरुन अरुण जेटली यांना लक्ष्य केले आहे. यावेळी जेटलींनी डीडीसीए घोटाळ्याचा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले, हे प्रकरण सीरियस फ्रॉड ऑफिसकडे (एसएफआयो) दिले होते. २०१३ मध्ये एसएफआयोने दिलेल्या अहवालात कंपनीच्या प्रक्रियेत गडबड झाल्याचे म्हटले होते, मात्र काही घोटाळा झाला असल्याचे अमान्य केले होते. माझ्या प्रकरणात काही सदस्यांच्या चूका त्याला जबाबदार होत्या. हे प्रकरण माझ्याबद्दल नव्हतेच.’
डीडीसीए घोटाळ्यात आम आदमी पार्टीनंतर भारतीय जनता पक्षाचे खासदार किर्ती आझाद मोठा खुलासा करण्याची शक्यता आहे.