धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप करत एका महिलेनं केला स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूत घडली आहे. या महिलेनं रामनाथपुरम जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या महिलेला तिथे उपस्थित असलेल्या पोलीस आणि अधिकाऱ्यांनी वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. वलरमथी असं या महिलेचं नाव आहे.

पचेरी गावातील वलरमथी नावाच्या या महिलेनं सांगितलं की, तिच्या गावातील देवदास नावाच्या व्यक्तीच्या कुटुंबाकडून तिला आणि तिच्या कुटुंबाला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं जातंय. धर्मांतर करण्यास नकार दिल्याने देवदास आणि त्याचे कुटुंबीय २०१९ पासून तिचा आणि तिच्या कुटुंबाचा छळ करत असल्याचा आरोप तिने केला. याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे आपण आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तिने केलाय. तसेच गावात अनेकांचं धर्मांतर झाल्याचा दावाही तिने केलाय.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, १५ मे रोजी वलरमथी जिल्हाधिकारी कार्यालयात गेली. त्यावेळी अधिकाऱ्यानी लोकांच्या तक्रारी आणि प्रश्न ऐकत असताना तिने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरात उपस्थित असलेल्या पोलिसांनी आणि नागरिकांनी तिला रोखले. यावेळी ती म्हणाली की, “२०१९ पासून देवदास आणि त्याचे हिंदू धर्मातून कुटुंबीय ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी माझा छळ करत आहेत. देवदासच्या कुटुंबीयांनी माझ्या घरचा रस्ता बंद केला आणि माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. आम्ही कोर्टात गेलो, कोर्टात आमच्या बाजूने निकाल लागल्याने त्याने गाडीने चिरडून मला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून मी पोलिसांकडे गेले. पोलिसांनी कारवाई करण्याचं वचन दिलं परंतु कारवाई केली नाही. त्यांनी माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकांनी त्याला वाचवलं, देवदासमुळे गावात जगणं कठीण झालंय,” अशी माहिती या महिलेनं दिली.

दरम्यान, रामनाथपुरम पोलीस अधीक्षक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले की, महसूल विभाग अधिकारी आणि पोलीस उप अधीक्षक यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. ज्यामध्ये हा मुद्दा जमिनीच्या वादावर आधारित असल्याचं समोर आलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन कुटुंबांमध्ये जमिनीचा वाद सुरू असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.

Story img Loader