Shocking News : राजस्थानच्या जयपूर येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर वेळेत उपचार झाले असते तर ती कदाचित वाचली असती. परंतु, EMRIGHS च्या अनास्थेमुळे तिला तिचा जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने चार सदस्यी चौकशी समितीही स्थापन केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
जयपूर येथे एका महिलेने तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या कुटुंबियांनी सांगितले की तिने केलेला आत्महत्येचा प्रयत्न आम्हाला वेळेत कळला, त्यामुळे आम्ही तिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जात होतो. मात्र, रुग्णावाहिकेचा दरवाजा जाम झाल्याने तिच्यावर वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सुविधाही नव्हती. तर कर्मचारीही वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी नव्हता. यामुळे रुग्णवाहिकेत अडकलेल्या महिलेवर वेळेत उपचार करता आले नाहीत. गोल्डन अवर्समध्ये तिला उपचार मिळाले नाहीत. रुग्णवाहिकेचा दरवाजा बराच काळ उघडत नसल्याने अखेर रुग्णवाहिकेतील काचा फोडण्यात आल्या.
भिलवाड्याचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. सी. पी. गोस्वामी म्हणाले, आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थान केली आहे आणि लवकरच अहवाल सादर करण्यात सांगितले आहे. या अहवालात रुग्णवाहिकेचे शेवटचे ऑडिट केव्हा झाले, ड्रायव्हरचा अनुभव, शवविच्छेदन अहवाल आणि आपत्कालीन वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती यांचा समावेश असणार आहे.
EMRIGHS ने दावा फेटाळला
रुग्णवाहिकेचे दरवाजे खराब झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा EMRIGHS ने नाकारले आहे. रुग्णाला रुग्णवाहिकेत ठेवल्यानंतर त्यांची कोणतीही हालचाल जाणवली नाही. त्यामुळे त्यांचा आधीच मृत्यू झाला होता. याबाबत आमच्याकडे कागदपत्रे आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
रुग्णवाहिकेला १९ जानेवारी रोजी सकाळी ९.५१ वाजता आपत्कालीन फोन आला. त्यानंतर ९.५६ ला रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. सकाळी १०.१३ वाजता ते रुग्णाला घेऊन एम. जी. रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी निघाले. यापूर्वी रुग्णवाहिकेचा दरवाजा व्यवस्थित कार्यरत होता. तसंच, ८ जानेवारी रोजीच रुग्णवाहिकेत सिलिंडर भरून ठेवला होता.